Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Haldi and Wedding : झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे पहिले रत्न गाजवणारे गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांनी काही दिवसांपूर्वी ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत लग्न करणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. तेव्हापासून ही जोडी केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर २१ डिसेंबर रोजी मुग्धा व प्रथमेश बोहोल्यावर चढले आहेत. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाच्या फोटो, व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
अत्यंत साधेपणाने मुग्धा व प्रथमेश यांचा विवाहसोहळा पार पडला असल्याचं दिसतंय. चिपळूण येथे दोघांनी डेस्टिनेशन वेडिंगचा घाट घातला होता. त्यांचा विवाहसोहळा कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. लग्नादिवशी दोघेही खूप खुश दिसत होते. कलाक्षेत्रातील बऱ्याच कलाकार मंडळींनी मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला हजेरी लावली होती. चाहत्यांनाही त्यांची ही लाडकी जोडी अखेर विवाहबंधनात अडकल्याने आनंद झाला आहे.
‘आमचं ठरलंय ते आमचं झालंय’, इथवरचा दोघांचा संपूर्ण प्रवास पूर्ण झाला आहे. अखेर लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नातील फोटोची पहिली पोस्ट शेअर केली आहे. पारंपरिक अंदाजात लग्नातील शेअर केलेलं फोटो साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या या पोस्टवर सिनेक्षेत्रातील कलाकार मंडळींनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षांव केला आहे. तसेच अनेकांनी त्यांची ही पोस्ट रिपोस्ट करत त्यांना शुभाशीर्वाद दिले आहेत.
मुग्धा व प्रथमेशने लग्नाआधीच्या विधींचे फोटोही शेअर केले होते. ग्रहमख, हळदीचे पारंपरिक फोटो त्यांनी शेअर केले होते. दोघांनी घरच्या घरीच हळदी समारंभ सोहळा उरकला. लग्नातील त्यांचा पुण्यवचन व रिसेप्शनचा लूकही साऱ्यांना विशेष भावला. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण त्यांच्या लूकचंही कौतुक करत आहेत.