Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Haldi and Wedding : मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अशातच आणखी एक कलाकार जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. अल्पावधीतच या जोडीच्या हळदी समारंभाच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ही कलाकार जोडी म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. मुग्धा व प्रथमेश यांचं लवकरच लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे.
नुकतेच मुग्धा व प्रथमेश यांच्या हळदी समारंभातील फोटो समोर आले आहेत. दोघांनी त्यांच्या हळदी समारंभातील खास क्षण सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. मुग्धा व प्रथमेशची हळद पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. प्रथमेशने त्याच्या हळदी समारंभातील खास फोटो शेअर करत “हरिद्रा लापन । मांगलिक स्नान” असं म्हटलं आहे. या फोटोंमध्ये नववराचा लूक खुलून आलेला दिसतोय.
तर गायिका मुग्धाने तिच्या हळदी समारंभातील फोटो शेअर केले आहेत. मुग्धाची हळद तिच्या घरी साजरी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मुग्धाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर तेज आलेलं पाहायला मिळत आहे. मुग्धाने शेअर केलेल्या हळदीच्या फोटोंमध्ये तिचं संपूर्ण कुटुंबही पाहायला मिळत आहे. दोघांनी अत्यंत साधेपणाने त्यांची हळद उरकली आहे. त्यांनी शेअर केलेल्या हळदीच्या फोटोंवरून मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
प्रथमेश व मुग्धा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावरूनच त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली चाहत्यांसह शेअर केली होती. तेव्हापासून सगळ्यांना मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. आता चाहत्यांची ही उत्सुकता लवकरच पूर्ण होणार असून ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. याआधीही दोघांच्या केळवणाचे, व्याहीभोजनाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.