Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate : कामानिमित्त अनेक कलाकार मंडळी हे परदेश दौरे करताना दिसतात. परदेश दौऱ्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. अशातच मराठी कलाविश्वातील प्रेक्षकांची एक लाडकी जोडीदेखील कामानिमित्त परदेश दौऱ्याला रवाना झाली आहे. ही जोडी म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घराघरांत लोकप्रिय झालेले प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन दोघेही नेहमीच चर्चेत राहिले. आपल्या सुमधूर आवाजाने प्रथमेश-मुग्धा यांनी आपल्या रसिक श्रोत्यांची मनं जिंकली आहेत.
मुग्धा व प्रथमेश हे दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच मुग्धा व प्रथमेश त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमानिमित्त परदेशात रवाना होत असतानाचे त्यांनी सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत. ‘मर्म बंधातील ठेव’ या प्रथमेश व मुग्धाच्या गायनाच्या शोचे लाखो दिवाने चाहते आहेत. भारतात विशेषतः महाराष्ट्रात त्यांच्या हे शो होताना दिसतात.
आता प्रथमेश व मुग्धा हा लाईव्ह शो करण्यासाठी परदेशात रवाना झाले आहेत. “लेट्स गाऊ टू ऑस्ट्रेलिया. मर्म बंधातील ठेव चा लाईव्ह परफॉर्मन्स ऑस्ट्रेलिया ते न्यूझीलंड येथे”, असं कॅप्शन देत त्यांनी एअरपोर्टवरील सुंदर असा फोटो शेअर केला आहे. यावेळी परदेशवारीसाठीचा दोघांचा हटके लूकही साऱ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसला. प्रथमेश व मुग्धाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कलाकार व गायकांनीही या पोस्टवर कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.
गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे यांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत सोशल मीडियावरुन प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यांच्या लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली. मुग्धा व प्रथमेशच्या गायनाचे लाखो चाहते दिवाने आहेत. अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल गायनाचे शो करत त्यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. लग्नानंतर बरेचदा दोघेही एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसले. विशेषतः प्रथमेश व मुग्धा यांची जोडी लग्नानंतर बरीच चर्चेत राहिलेली दिसली.