एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात पुरस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या पुरस्कारांमुळेच कलाकारांना आणखी काम करण्याचा हुरूप येत असतो. कलाकारांना प्रेक्षकांकडून त्यांच्या कामाची पोचपावती सोशल मीडियाद्वारे मिळतच असते. मात्र तरीही एका प्रतीकाच्या रूपात त्या वाहिनीवरील पुरस्कार मिळणे हे कलाकारांसाठी महत्त्वाचे असते आणि यासाठी कलाकार मेहनत घेत असतात. त्यामुळे मालिकांमध्ये काम करणारे सर्वच कलाकार पारितोषिक सोहळ्यांसाठी फारच उत्सुक असतात. मालिकाविश्वातील असा एक महत्त्वाचा पूरस्कार सोहळा म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘झी पुरस्कार’. हा सोहळा म्हणजे डोळ्यांची पारणं फेडणारा सोहळा असतो. अशातच नुकताच यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडला. (aishwarya narkar reaction on not getting awards)
यंदाचा झी मराठीचा पुरस्कार सोहळा खास होता. कारण यंदाच्या वर्षी झी मराठी वाहिनीला तब्बल २५ वर्षे पूर्ण झाली. या पुरस्कार सोहळ्यात अनेकांनी सहभाग घेतला होता. ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता. तसेच प्रेक्षकांचे आभारही मानले होते. मात्र यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका फेम ऐश्वर्या नारकरांना पुरस्कार मिळाला नाही. त्यांना गेली दोन वर्षे नामांकन असूनही पुरस्कार मिळाला नाही. यामुळे त्यांना हिरमुसल्यासारखं वाटलं असून याबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ऐश्वर्या यांनी आपल्या युट्यूब वाहिनीद्वारे याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – ठाण्यातील वाहतूक कोंडीला वैतागली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “मुली वाचवा, मुली शिकवा आणि मुलीला…”
गेली दोन वर्षे पुरस्कार न मिळाल्याबद्दल ऐश्वर्या यांनी असं म्हटलं आहे की, “अलीकडेच झी मराठीचा पुरस्कार सोहळा झाला. माझी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर सुरु आहे. तुम्ही ती बघतच असाल. त्यात मी नकरात्मक भूमिका (खलनायिका) करत होते. या मालिकेत मी रुपाली, विरोचक त्यानंतर शतग्रीव अशी तीन पात्रे केली आणि आताचे माझे मैथिली हे पात्र सकारात्मक आहे. या पुरस्कारमध्ये माझं खलनायिका म्हणून नॉमिनेशन होतं. पण मला पुरस्कार मिळाला नाही. मागच्या वर्षीही मला नॉमिनेशन होतं. पण मागच्या वर्षीही मला ते मिळालं नाही. त्यामुळे मला जरा हिरमुसल्यासारखं झालं. कारण मला पुरस्कार खूप आवडतात”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मला असं वाटतं की, पुरस्कार म्हणजे तुमच्या कामाची पावती आहे. म्हणजे यामुळे लोकाश्रय मिळतो. लोकांना आपलं काम आवडतं यामुळे खूप छान वाटतं. एखादी भूमिका लोकांपर्यंत पोहोचली आणि तुमच्या कामाची लोकांकडून पावती मिळाली. तर आपण ती भूमिका १०० टक्के केली असं म्हणू शकतो. पण लोकाश्रयाबरोबरच राजाश्रय मिळाला तर तीसुद्धा जास्त छान वाटणारी गोष्ट असते. त्यामुळे मला पुरस्कार आवडतात. पण दुर्दैवाने दोन्ही वर्षी मला पुरस्कार मिळाले नाहीत. पण यंदाचा पुरस्कार सोहळा खूपच छान झाला. कारण यंदा झी मराठीला २५ वर्षे पूर्ण झाली”.