सध्या सिनेसृष्टीत लग्नाची धामधूम सुरु असताना एकामागोमाग एक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहेत. अशातच गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश ही जोडीही विवाहबंधनात अडकली. २१ डिसेंबर रोजी मुग्धा-प्रथमेशचा शाही थाटामाटात विवाहसोहळा संपन्न झाला. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक गायक व कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नसोहळ्यातील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)
मुग्धा-प्रथमेशच्या लग्नसोहळ्याबरोबरच त्यांच्या पारंपरिक पद्धतीने केलेल्या हळदी व ग्रहमख समारंभाचेही फोटो चांगलेच व्हायरल झाले. अत्यंत साधेपणाने व पारंपरिक पद्धतीने घरच्या घरीच त्यांनी हे लग्नाआधीचे विधी पूर्ण केले. त्यांच्या हळदी व ग्रहमखचे फोटोही चाहत्यांच्या पसंतीस पडले. लग्नामुळे मुग्धा-प्रथमेशची जोडी विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळाली. मुग्धा-प्रथमेशचा विवाहसोहळा चिपळूणमध्ये मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीनुसार पार पडला.
लग्नानंतर आता मुग्धा-प्रथमेशचा पूजेतील एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. दत्तजयंती स्पेशल पूजेत मुग्धा व प्रथमेश भजन गाताना दिसत आहेत. भजनाची जुलगलबंदी मुग्धा-प्रथमेश यांच्यात रंगलेली समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. लग्नानंतर दोघांनी एकत्र पहिलाच गायनाचा कार्यक्रम त्यांच्या गावी केलेला पाहायला मिळत आहे. मुग्धा व प्रथमेश त्यांचे लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहेत. लग्नानंतरचा त्यांचा पहिला असा एकत्र व्हिडीओ समोर आल्याने चाहतेही आनंदी झाले आहेत.
मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाची अजूनही क्रेज असलेली पाहायला मिळत आहे. त्यांच्या लूकचं सगळेच कौतुक करताना दिसत आहेत. मुग्धाने लग्नात पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, तर प्रथमेशने लाल रंगाच्या कुर्त्यावर पुणेरी पगडी असा लूक केला होता. याशिवाय दोघांच्या साखरपुड्याच्या रोमँटिक फोटोंनीही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नसोहळ्याला रोहित राऊत, जुईली जोगळेकर, शमिका भिडे, अवंती पटेल, कार्तिकी गायकवाड या कलाकारांनी उपस्थिती लावली होती.