बॉलिवूड अभिनेता अरबाज खान नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.अरबाजने वयाच्या ५६व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. २४ डिसेंबर २०२३ रोजी त्याने त्याची गर्लफ्रेंड मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले. अरबाज व शूरा यांचा लग्नसोहळा त्याची बहीण अर्पिता खानच्या घरी संपन्न झाला. अरबाजच्या लग्नासाठी संपूर्ण खान कुटुंबाने अर्पिताच्या घरी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. मात्र अरबाजचं दुसरं लग्न पाहून नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं. (Salim Khan On Arbaaz Wedding)
या सर्व प्रकरणात अरबाज खानच्या वडिलांनी आपल्या मुलाला पाठिंबा दिला असल्याचं पाहायला मिळतंय. मुलाच्या दुसऱ्या लग्नावर अभिनेत्याच्या वडिलांनी प्रत्युत्तर दिले आहे. “पुन्हा लग्न करणे हा गुन्हा नाही”, असं म्हणणं त्यांनी मांडलं आहे. ‘नेटवर्क १८’च्या रिपोर्टनुसार, सलीम खान त्यांच्या मुलाच्या लग्नामुळे खूप खूश आहेत. याबाबत ते म्हणाले, “दोन्ही मुलांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या मते ते पाप नाही. मी खूप आनंदी आहे. माझे आशीर्वाद वधू-वरांना आहेत” असं त्यांनी लेकाच्या लग्नाबाबत म्हटलं.
यादरम्यान, सलीम खान यांना अरबाज खानने घरात लग्नाबाबत काही चर्चा केली आहे का, असा प्रश्नही विचारला होता. यावर सलीम खान यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “मला वाटत नाही की, याबद्दल काहीही चर्चा करण्याची गरज आहे. अरबाज तरुण, सुशिक्षित, बुद्धिमान आहे. तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. अशावेळी माझ्या परवानगीची काय गरज? जर तो आनंदी असेल तर मला काही फरक पडत नाही” असं ते म्हणाले.
अरबाज खानच्या लग्नात खान कुटुंबासह सिनेसृष्टीतील कलाकारही हजर होते. २१ वर्षीय मुलगा अरहान खानही त्याच्या दुसऱ्या लग्नाला उपस्थित होता. सलमान खान, सोहेल खान, अर्पिता खान, आयुष शर्मा, अलविरा अग्निहोत्री, सलमा खान यांच्यासह संपूर्ण खान कुटुंब या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. अरबाजचे पहिले लग्न मलायका अरोरासह झाले होते, पण २०१७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.