हिंदी कलाविश्वतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेते साजिद खान यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी ‘मदर इंडिया’ या चित्रपटामधील सुनील दत्त यांच्या बिरजूच्या लहानपणातील भूमिका साकारली होती. बिरजू या पात्राची साजिद खान यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली होती. साजिद यांचा मुलगा समीर खाने पिटीआयला दिलेल्या वृत्तानुसार साजिद खान यांचे कर्करोगाने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून साजिद खान कॅन्सर आजाराने ग्रस्त होते. गेल्या शुक्रवारी म्हणजेच (२२ डिसेंबर) रोजी त्यांचं निधन झाल्याची माहिती समीरने दिली. साजिद यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि त्यानंतर ते केरळमध्ये स्थायिक झाले होते. चित्रपटसृष्टीपासून ते दूर गेले होते आणि समाजहिताच्या कामात गुंतल्याचंही समीरने सांगितलं. (Mothe India Fame Actor Sajid Khan Passes Away)
“माझ्या वडिलांना राजकुमार पितांबर राणा आणि सुनीता पितांबर राणा यांनी दत्तक घेतले होते. तर मेहबूब खान यांनी त्यांचे पालनपोषण केले. ते चित्रपटामध्ये फारसे सक्रिय नव्हते आणि अधिकतर लोककल्याणासाठी काम करत होते. ते अनेकदा केरळमध्ये यायचे आणि याठिकाणी त्यांना चांगले वाटायचे. मग त्यांनी दुसरे लग्न केले आणि ते इथेच वास्तव्य करू लागले.” असेही समीरने म्हटले.
ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या ‘मदर इंडिया’नंतर साजिद खानने मेहबूब खान यांच्या ‘सन ऑफ इंडिया’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. ‘माया’मध्ये काम केल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. या चित्रपटात त्यांनी ‘रज्जी’ ही भूमिका साकारली होती. त्यानंतर तरुणाईमध्ये ते विशेष लोकप्रिय झाले होते. त्यानंतर ‘माया’ याच नावाने एक मालिकाही प्रसारित झालेली आणि यामुळे साजिद यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखी वाढ झाली होती.
साजिद यांनी फिलीपिन्समध्येही आपले नाव कमावले होते. तसेच त्यांनी नोरा अनोरसह ‘द सिंगिंग फिलिपिना’, ‘माय फनी गर्ल’ आणि ‘द प्रिन्स आणि मी’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. साजिद खानने मर्चंट-आयव्हरी प्रोडक्शन ‘हीट अँड डस्ट’मध्ये एका डाकू प्रमुख भूमिकाही साकारली होती.