ख्रिसमसनिमित्त बी-टाऊनमध्ये सध्या जंगी सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. यांत कपूर कुटुंबीयही काही मागे राहिलेलं नाही. कपूर कुटुंबाने एकत्र येत यंदाचा ख्रिसमस दणक्यात साजरा केलेला पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वीच रणबीर व आलियाने लेक राहाचा चेहरा दाखवत साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तेव्हापासून रणबीर-आलिया विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ख्रिसमस सेलिब्रेशनचा कपूर कुटुंबाचा समोर आलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. (Ranbir Kapoor Troll)
ख्रिसमस निमित्त कपूर कुटुंबीय एकत्र आलेले असताना रणबीर केकवर दारू ओतून तो केक पेटवताना दिसत आहे. त्यानंतर तो ‘जय माता दी’ असं म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्सनी रणबीर कपूरला ट्रोल करायला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर हिंदु धर्माला अपमान केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. रणबीरबरोबर त्याच्या कुटुंबियांविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय व पंकज मिश्रा यांच्यातर्फे वकील संजय तिवारी यांनी ही तक्रार केली आहे. तक्रार पत्र लिहून रणबीर कपूर केकवर दारू ओतत आहे आणि तो केक जाळताना ‘जय माता दी’ म्हणत आहे असा दावा करण्यात आला आहे.
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी शुद्ध वस्तू आणि वस्तूंचा नैवेद्य दाखवून अग्निदेवतेचे पूजन केले जाते. मात्र रणबीर कपूरने यासाठी दारूसारख्या अशुद्ध गोष्टींचा वापर केला, ज्यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. दारू ओतून केक पेटवून दिल्यानंतर रणबीरने जय माता दीचा म्हणताच कुटुंबातील इतर सदस्यांनीही त्याचे अनुकरण केले. या सर्वांनी हिंदू धर्मात निषिद्ध असलेल्या दारूसारख्या पदार्थाचा वापर करून जाणूनबुजून जय माता दी म्हटल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रार दाखल करण्याबरोबरचं वकिलाने अभिनेता आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध आयपीसीच्या कलम २९५, ५०९ व ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.