महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तान कलाकार, गायक यांच्याविरोधात कायमच आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळाले आहे. पुलवामा हल्ल्याचे पडसाद फक्त सीमेवरच नाही तर, भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सीमेच्या अंतर्गतही हा वाद चालला. या हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती आणि यादरम्यान भारतात कोणत्याच पाकिस्तानी कलाकारांना भारतात संधी देण्यात आली नव्हती. मात्र, नुकतीच ही बंदी हटवण्यात आली आहे.
पाकिस्तानी कलाकार अतिफ अस्लम सात वर्षांनंतर भारतीय चित्रपटात गाणं गाणार आहे. ‘लव्ह स्टोरी ऑफ ९०’ या आगामी चित्रपटातील गाणं गाण्याची ऑफर अतिफ अस्लमला देण्यात आली. परंतु, भारतात पाकिस्तानी कलाकारांना अघोषित बंदी असतानाही अतिफ अस्लम बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याने राजकीय विश्वातून नाराजी व्यक्त केली जात आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी यासंबंधीत एक पोस्ट शेअर करत त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.
अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 5, 2024
विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव…
अमेय खोपकर यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालत आहेत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करत आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागत आहे, हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि यापुढेही ती राहणार आहे. फक्त बॉलीवूडच नाही, तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतो आहे.”
दरम्यान, अतिफ अस्लमने सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात शेवटचं गाणं गायलं होतं. त्यानंतर भारत-पाकिस्तानातील वाढत्या संघर्षामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारतात कला सादर करण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण आता अतिफ पुन्हा त्याच्या बॉलिवूडमधील पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. पण त्याला त्याचे हे आगामी गाणं गाता येणार आहे का? याबद्दल त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे.