मराठी-हिंदी मालिकांमध्ये आणि मोजक्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत अभिनेत्री मिताली जगताप यांनी सिनेसृष्टीत आपलं नाव कमवायला सुरुवात केली. त्यानंतर ‘बाबू बँड बाजा’ या या चित्रपटासाठी त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे त्या चर्चेत आल्या. मात्र त्यानंतर काही वर्षांसाठी मिताली या पुन्हा दिसेनाश्या झाल्या. सध्या मिताली ‘अबीर गुलाल’ या मालिकेतून पुन्हा मालिकाविश्वात कार्यरत झाल्या आहेत. मालिकेच्या निमित्ताने त्यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनलच्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबाबत बऱ्याच गप्पा मारल्या. (Mitalee Jagtap emotional Incident)
मिताली जगताप यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, कौटुंबिक गोष्टी सुरु आहेत, कुटुंबाच्या पाठिंब्याद्दल तुम्ही बोलत आहात तर प्रत्येक परिस्थिती सांभाळण्याची ताकद आई-बाबांकडून आली का?. या प्रश्नाचं उत्तर देत मिताली म्हणाल्या, “खूप भावुक करणारा हा प्रश्न आहे. मी माझ्या वडिलांची मुलगी आहे. ते खूप चांगले साहित्यिक होते, कवी होते. माझी आई खूप रसिक होती. जेव्हा माझ्या आईने मला भरतनाट्यम शिकायला पाठवलं तेव्हा माझे सख्खे काका म्हणायचे, आपल्या घरामध्ये मुली नाचत नाहीत. आपण नाचवतो आपण नाचत नाही हे त्याकाळी त्यांचं मत होतं”.
पुढे त्या म्हणाल्या, “अशा कुटुंबातून माझे वडील आमच्या शिक्षणासाठी घराबाहेर पडले. माझ्यासाठी माझे वडील हा खूप मोठा आधारस्तंभ होते. आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे. मला दोन मोठे भाऊ आहेत. पण मुलगा मुलगी हा फरकही कधी दिसला नाही. तुला काय हवं ते कर असं म्हणत ते कायम माझ्याबरोबर होते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, २०११ साली अवॉर्ड घोषित झाला. तेव्हा ते कोमात गेले. त्यांची इच्छा अपूर्ण राहिली”.
पुढे यांनी म्हटलं की, “माझ्या वडिलांची आवडती अभिनेत्री स्मिता पाटील होती. त्यामुळे अगदी लहानपणापासून माझ्या कानावर शब्द पडायचे की, ही किती सुंदर अभिनय करते. हे ऐकून ऐकून मला पण असं वाटू लागलं की मी पण जर हिच्यासारखं केलं तर कदाचित माझे बाबा माझ्यावर खुश होतील. हे तेव्हापासून माझ्या डोक्यात फिट बसलं होतं. त्यानंतर मी त्याचं कामाच्या शोधात होते. आणि जेव्हा हे दाखविण्याची वेळ आली तेव्हा त्यांना कळण्यासारखं काहीच राहील नव्हतं”.