Meenal Shah New Home : आपलं स्वतःचं हक्काचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांप्रमाणे अगदी कलाकार मंडळीही अहोरात्र मेहनत करत त्यांचं हे नवं घर घेण्याचं स्वप्न उराशी बाळगतात आणि पूर्ण करतात. बऱ्याच कलाकारांनी वर्षभरात नवं घर घेतलं असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली. अशातच एका मराठमोळ्या आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीचं नवं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ‘बिग बॉस मराठी’ सीझन ३ ची टॉप ५ पैकी एक सदस्य म्हणजे मीनल शाह. दिवाळीच्या मुहूर्तावर मीनलने नवं कोर घर घेतलं असल्याचं सांगितलं आहे. मीनलने घेतलेलं हे घर खूप चांगल्या पर्यटन स्थळावर आहे.
मीनलने थेट गोव्यात तिचं स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने याबाबतची माहिती दिली आहे. अनेकवर्ष प्रयत्न, प्लॅनिंग व परिश्रम करुन तिने स्वतःचं घर घेतलं असल्याचं म्हटलं आहे. मीनलचं गोव्यातील घर एकदम आलिशान असल्याचं समोर आलं आहे. मीनलने तिच्या आलिशान घराचे फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट केले आहेत.
हे पोस्ट शेअर करत तिने कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “गणपती बाप्पा मोरया! त्याची सुरुवात काही वर्षापूर्वी झाली, जेव्हा आम्ही आमच्या स्वप्नातलं घर बनवायचं ठरवलं, त्यावेळी आम्ही फक्त ठरवलं होतं आणि तेव्हा प्रत्येकजण प्रचंड उत्साहित होता. हो, पण ते वाटतंय इतकं सोपं नव्हतं, परंतु आता जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो तेव्हा त्याची किंमत कळतेय. जागेची उत्तम निवड ते आम्ही ज्या प्रकारे कल्पना केली त्याप्रमाणे संपूर्ण घर तयार करण्यापर्यंत, ते रोलरकोस्टर राईडसारखं होतं. शेवटी आमचं स्वप्न सत्यात उतरलं”.
पुढे तिने असं म्हटलं आहे की, “धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही गोव्यातील नव्या घरात प्रवेश केला. अनेक वर्षाच्या अथक परिश्रमानंतर, विश्रांती न घेता आणि देवाच्या कृपेने आम्ही आमचे स्वप्न पूर्ण करु शकलो. मला स्वतःचा खूप अभिमान वाटत आहे. माझ्या कुटुंबीयांसमवेत मी गृहप्रवेश करत आहे. याबद्दल मी स्वतः ला खूप भाग्यवान समजते. ‘सपने देखने से लेकर उनको पूरा करने तक का सफर’ शेअर करत आहे”, असं लिहीत मिनलने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. चाहते आता तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.