Sharda Sinha Passed Away : संगीत विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे, ती म्हणजे भोजपुरी लोकगायिका शारदा सिन्हा यांचं निधन झालं आहे. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात शारदा सिन्हा यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या सुमधूर गायकीने सर्वांची मनं जिंकणाऱ्या शारदा यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. शारदा सिन्हा यांच्या मुलाने आईच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. (Singer Sharda Sinha Passed Away)
अंशुमन सिन्हा यांनी आपल्या आईचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत, “तुमच्या प्रार्थना आणि प्रेम सदैव आईसोबत असेल. छठी मैयाने आईला स्वतःकडे बोलावले आहे. आई आता शारीरिकदृष्ट्या आपल्यात नाही” अशी भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्स करत शारदा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केवळ रसिक श्रोतेच नव्हे तर अनेक क्षेत्रातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचं निधन झाल्यामुळे फार दुःख झालं आहे. त्यांनी गायलेली मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत” अशी भावुक पोस्ट शेअर केली आहे.
शारदा यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात रात्री ९.२० वाजता अखेरचा श्वास घेतला. शारदा सिन्हा अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त होत्या. अलीकडेच त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. यामुळे त्यांना खासगी वॉर्डमध्ये हलवण्यात आले. मात्र, सोमवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
दरम्यान, शारदा सिन्हा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. शारदा या मैथिली व भोजपुरी गाण्यांसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘विवाह गीत’ आणि ‘छठ गीत’ यांचा समावेश आहे. ‘मैंने प्यार किया’ मधील ‘काहे तो सजना’सारख्या काही बॉलिवूड गाण्यांना त्यांचा आज लाभला आहे. ‘हम आपके है कौन’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत.