आयपीएल या बहुचर्चित क्रिकेट स्पर्धेचा यंदाचा हंगाम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चर्चेत सर्वाधिक महत्वाचा असणारा मुद्दा म्हणजे ‘मुंबई इंडियन्स’चा संघ आणि या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या. धडाकेबाज फलंदाज व हुशार कर्णधार म्हणून ओळख असणाऱ्या रोहित शर्माला यंदाच्या हंगामात कर्णधार पदावरून हटवण्यात आले आणि त्याच्या जागी हार्दिकला पुन्हा संघात स्थानदेत थेट कर्णधार पद देण्यात आले. त्यानंतर प्रेक्षकांनी प्रचंड राग व्यक्त करत प्रत्येक ठिकाणी हार्दिकच्या विरोधात घोषणा देत या घटनेचा विरोध केला. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मुंबई- राजस्थान यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या आगामी मॅच दरम्यान हार्दिक पांड्याला ट्रोल केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि यासाठी अतिरिक्त पोलीस फौज वानखेडे स्टेडियमवर तैनात करण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. (MCA On Trolling Of Hardik Pandya)
या सर्व अफवा असल्याचं आता मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून स्पष्ठ करण्यात आलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार ‘भारतीय क्रिकेट नियमक मंडळ’ यांच्या नियमांनुसार या प्रकारचे कोणतेही निर्बंध चाहत्यांवर लादता येत नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलं आहे. त्यामुळे कोणत्याही चाहत्यांवर आता याप्रकारची कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई क्रीकरत असोसिएशनच्या या स्पष्टीकरणानंतर आजच्या सामन्या दरम्यान चाहते हार्दिकला पाठिंबा देणार कि हार्दिकला पुन्हा प्रेक्षकांच्या रागाला समोर जावं लागणार या बाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. चाहत्यांकडून या पराभवांचे खापर कर्णधार हार्दिक पांड्यावर फोडण्यात आले. सामन्या दरम्यान हार्दिकने घेतलेल्या काही निर्णयांमुळे मुंबई इंडियन्सने हे सामने गमावले असं चाहत्यांसह काही माजी खेळाडूंचं देखील मत आहे. (MCA On Trolling Of Hardik Pandya)
या संदर्भात माजी भारतीय गोलंदाज इरफान पठाण व युसूफ पठाण यांनी ट्विट करत देखील याबाबत भाष्य केले होते. इरफान पठाण ने ट्विट करत लिहिलं होतं ,”हार्दिकचे प्लॅन्स माझ्या समजण्यापलीकडेचे आहेत बुमराह सारखा अनुभवी गोलंदाज असताना त्याने त्याला योग्य वेळी गोलंदाजीसाठी का नाही बोलावले?” तसेच क्रिकेटपटू युसूफ पठाणने देखील ट्विटद्वारे पोस्ट करत चांगलीच टीका केली होती,”हैद्राबादने केवळ ११ षटकात तब्बल १६० इतकी धावसंख्या उभी केली तोपर्यंत बुमराह सारख्या अनुभवी गोलंदाजाला का लांब ठेवण्यात आलं होतं?”