मराठी गायिका मुग्धा वैशंपायन ही तिच्या सुमधुर गाण्यांमुळे घराघरांत पोहोचली आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून मुग्धाने प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. लवकरच प्रेक्षकांची लाडकी मुग्धा गायक प्रथमेश लघाटेबरोबर बोहोल्यावर चढणार आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ‘आमचं ठरलं’ असं म्हणत त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. त्यांनतर आता ही जोडी कधी लग्नबंधनात अडकणार याकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. (Mugdha Vaishampayan Father Retirement)
प्रथमेश व मुग्धा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. काही ना काही शेअर करून ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. याशिवाय अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे व्हिडिओही ते चाहत्यांसह शेअर करत असतात. अशातच मुग्धाने सोशल मीडियावरून शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धाने तिच्या वडिलांच्या निवृत्ती समारंभ सोहळ्याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
वडिलांच्या निवृत्ती समारंभाचा व्हिडीओ शेअर करत तिने खास कॅप्शन देत, “३० नोव्हेंबर २०२३. बाबा गेली सुमारे ३३ वर्ष नागोठणे येथील IPCL / रिलायंस इंडस्ट्रीस मध्ये कार्यरत होते. सलग ३३ वर्ष एकाच ठिकाणी, एकाच प्लांट मध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांचं आणि आमचं सुद्धा कंपनी बरोबर भावनिक नातं होतं, आजही आहे. ३० नोव्हेंबरला बाबा रिटायर झाले. त्या दिवसाचे काही भावनिक क्षण शेअर करत आहे” असं म्हटलं आहे.
मुग्धाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या वडिलांच्या कंपनीत त्यांनी सहकुटुंब उपस्थिती लावलेली पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये मुग्धाच्या वडिलांचा सत्कार सोहळा पाहायला मिळाला. यावेळी बोलताना मुग्धाचे वडील भावुकही झालेले दिसले. तसेच तिच्या वडिलांच्या सहकाऱ्यांनीही त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. सत्कार समारंभातून घरी परतल्यानंतर मुग्धा व तिच्या कुटुंबीयांनी घरी आल्यावर सरप्राईज देत त्यांचं स्वागतही केलं. मुग्धाच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट तिच्या वडिलांना रिटायरमेंटच्या शुभेच्छा दिल्या आहेत.