मराठी सिनेसृष्टीत आपल्या आवाजाने गेली कित्येक वर्षे शिंदे घराणे राज्य करत आहे. मराठी संगीत विश्वामध्ये या शिंदे घराण्याचा दबदबा त्यांची तिसरी पिढी कायम राखताना दिसते. आनंद शिंदे यांचे दोन्ही सुपुत्र उत्कर्ष आणि आदर्श यांचा आवाज सध्याच्या तरुणाईला नेहमीच वेड लावतो. यापैकी उत्कर्ष हा पेशाने डॉक्टर आहे. मात्र ‘बिग बॉस मराठी’मुळे त्याला त्याचा स्वतंत्र चाहता वर्ग मिळाला. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात उत्कर्षने टॉप ५ मध्ये मजल मारली होती. त्यानंतर तो ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेत अभिनय करतानादेखील दिसला. आपल्या संगीताने व गायकीने चर्चेत राहणारा हा उत्कर्ष सोशल मीडियावरही सक्रीय असतो. (Utkarsh Shinde Instagram Post)
सोशल मीडियावर उत्कर्ष अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उत्कर्षने एका अंध मुलीमधील गाण्याचे टॅलेंट ओळखून तिला गाण्याची संधी दिली आहे. उत्कर्षने यासंबंधित इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “अंधारात माणसे धडपडतात, अडखळतात. पण तू मात्र अंधाराला भेदून लखलखणाऱ्या सूर्यासारखी एक एक सूर लावत होतीस. तुला दिसत जरी नसलं, तू फक्त अंधाराच पाहिलास हे जरी खर असलं तरीही तूझे सूर त्यातील ऊर्जा वातावरण प्रकाशमान करतात”.
यापुढे उत्कर्षने असं म्हटलं आहे की, “मी तुमची फॅन आहे. मला तुम्हाला भेटायचं आहे. मुंबई ते पुणे एकटी प्रवास करुन मला भेटायला कार्यक्रम ऐकायला आलेली तू. बालगंधर्व रंगमंच्यावरील नेत्रहीन मुलांच्या रांगेत बसलेली तू. मला तुमच्याबरोबर स्टेज वर गायचं आहे. ती तुझी इच्छा तेव्हा त्या गर्दीत जरी हुकली तरीही तुझा आवाज, सूर, तू मला कॉल करुन ऐकवलास आणि मी तेव्हाच निश्चय केला की, तुझ्या आवाजात गाणं रेकॉर्ड करणारच. रिकॉर्डिंग स्टुडीओ, माईक, हेडफोन कधीच न पाहिलेली निरागस मुलगी जेव्हा स्टुडिओत येते आणि हाताने माइक टच करत अंदाज घेत पूर्ण गाणं उत्तम रित्या एका प्रख्यात मुरलेल्या गायिकेसारखं गाते”.
आणखी वाचा – अतुल कुलकर्णींच्या गाजलेल्या ‘बंदिश बँडिट्स’ सीरिजचा नवीन सीझन चाहत्यांच्या भेटीला, कधी व कुठे पाहता येणार?
यापुढे उत्कर्ष असं म्हणतो की, “बघणाऱ्याला अचंबित होतंच, पण ऐकताना वाटतं सरस्वती कंठात वसते तर ती अशी वसते. मी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला तू न्याय दिलास. मी संगीतबद्ध केलेलं गीत मला जसं हवं तसंच तू गायली आहेस. आज तुझ्यासाठी गाणं बनवताना वाटतं आपल्या कलेचं सार्थक झालं हीच भावना मनात आहे. अर्चना तुझ्या स्वरांनी माझं गाण मोठं नक्कीच झालं. खूप मोठी हो बाळा. हा भाऊ सदैव बरोबर आहे”.