बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. नोराने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच चित्रपटातील जबरदस्त आयटम सॉगमध्येदेखील दिसून आली आहे. नोरा सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते. तिच्या आयुष्यात घडणारे अनेक महत्त्वाचे प्रसंग ती चाहत्यांबरोबर शेयर करताना दिसते. तिच्या व्लॉगच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातल्या लहानातल्या लहान गोष्टींचा ती आढावा देते. अशातच तिचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओकडे आता सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये ती कुठे परदेशी नाही तर महाराष्ट्रातील एका गावामध्ये गेलेली दिसून येत आहे. याबद्दल तिने व्हिडीओमध्ये माहिती सांगितली आहे. (nora fatehi at ratnagiri)
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेल्या नोराच्या एका व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरु आहे. यामध्ये तिने चक्क ट्रेनने प्रवास करत कोकण गाठलं आहे. नोराच्या टीममधील अनुप हा गेले आठ वर्ष तिच्यासाठी काम करत आहे. त्याच्या लग्नासाठी नोराला आमंत्रित करण्यात आले होते. मात्र लग्नाला न जाता थेट तिने हळदीला हजेरी लावली. यावेळी तिने सगळा प्रवास कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. नोराने दादर रेल्वे स्टेशनमधून रत्नागिरीसाठी ट्रेन पकडली. संपूर्ण रात्रीचा प्रवास करत तिने रत्नागिरी गाठलं. नंतर सकाळी रत्नागिरी स्थानकावर तिचे स्वागत करण्यात आले.
हॉटेलवर पोहोचून सुंदर अशी पिवळ्या रंगाची साडी नेसून ती तयार होऊन अनुपच्या घरी हळदीच्या ठिकाणी पोहोचली. याठिकाणी तिचे आदरातिथ्य करण्यात आली. अनुपलादेखील तिने हळद लावली व त्याच्याबरोबर हळदीमध्ये नाचण्याचा आनंददेखील लुटला. याचवेळी तिला तेथील महिलांनी तिच्या कपाळाला कुंकू लावत साडी देऊन तिचा सन्मान केला. या सगळ्यामुळे नोरा खूपच भारावून गेलेली दिसली.
दरम्यान हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, “हा माझा छोटासा व्लॉग आहे. लग्नाच्या हळदी समारंभासाठी मी रत्नागिरी येथे जात आहे. हा खूपच सुंदर अनुभव होता. दूसरा व्हिडीओपण लवकरच येईल. जर कोणाला माहीत नसेल तर अनुप गेल्या आठ वर्षांपासून माझ्या टीममध्ये आहे. २०१७ पासून तो माझे फोटो काढत आहे. पण आता तो माझ्या कॅमेरासमोर आहे. मी खूप छान लोकांबरोबर छान वेळ घालवला. अनुप तुला लग्नाच्या खूप शुभेच्छा”. नोराचा हा स्वभाव चाहत्यांना खूप पसंत पडला आहे.