Marathi Actor Ravindra Berde Died at 78 : मराठी सिनेसृष्टीतील एक सितारा काळाच्या पडद्याआड गेला आहे. मराठी चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील बरीच वर्षे ते घशाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर टाटा रुग्यालयात उपचारही सुरु होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला.(ravindra berde passed away)
रवींद्र यांनी मराठीबरोबरच हिंदी अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. त्यांनी आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये विविध पात्र साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. त्यांच्या विनोदी भूमिका तर फार गाजल्या. १९९५ साली त्यांचं ‘व्यक्ती व वल्ली’ हे नाटक चालू होतं. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. पण त्यातून त्यांनी स्वतःला सावरलं. त्यानंतर २०११मध्ये त्यांना घशाचा कर्करोगाचं निदान झालं. तेव्हापासून ते या रोगाशी झुंज देत होते. मात्र त्यांचा हा लढा अपयशी ठरला.

रवींद्र यांनी मराठी सिनेसृष्टीला बरेच हिट चित्रपट दिले. ‘एक गाडी अनाडी’, ‘खतरनाक’, ‘होऊन जाऊ दे’, ‘हमाल दे धमाल’, ‘चंगू मंगू’, ‘थरथराट’, ‘उचला रे उचला’, ‘धडाकेबाज’, ‘गंमत जंमत’, ‘झपाटलेला’, ‘भुताची शाळा’, ‘हाच सुनबाईचा भाऊ’ यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका बऱ्याच गाजल्या. त्यांनी हिंदी चित्रपटांतही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. ‘सिंघम’ चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.
रवींद्र हे मराठी चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ तर नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांचे चुलत भाऊ होते. रवींद्र गेली काही वर्षे अभिनयापासून दूर होते. मात्र तरीही ते चांगली नाटकं, चित्रपट आवर्जून पाहायचे. रवींद्र यांची अभिनयाशी नाळ ही नभोवाणीमुळे जोडली गेली. आकाशवाणीत काम करत असताना त्यांना या क्षेत्राची आवड निर्माण झाली. १९६५ पासून आकाशवाणीवर नभोनाट्यांचे दिग्दर्शन करताना त्यांचा नाट्यसृष्टीशी संबंध आला. त्यानंतर १९८७साली त्यांना पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी सुरुवातीला खलनायकाच्या आणि नंतर विनोदी व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.