स्टार प्रवाह वाहिनीवरील नुकत्याच सुरू झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान व अभिनेता राज हंचनाळे यांच्या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. आतापर्यंत या मालिकेचे ५० हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. अगदी कमी वेळात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मालिकेतील रंजक वळणांमुळे ही मालिका अधिकच लोकप्रिय होत चालली आहे. (Chicken Party On Set Premachi Goshta Serial)
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या सेटवर कामाशिवाय काही इतर गमती जमतीसुद्धा होत असतात. मालिकेतील कलाकार हे अनेकदा कामानिमित्त बाहेर असतात. त्यामुळे त्यांना घरच्या जेवणाची आठवण येत असते. मात्र सेटवर कुणीतरी घरचे स्वादिष्ट जेवण आणले, तर सगळेच कलाकार त्यावर ताव मारतात. असाच काहीसा प्रकार या मालिकेच्या सेटवर झाला. या मालिकेच्या सेटवर नुकतीच चिकन पार्टी करण्यात आली. मालिकेत स्वातीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल गजमलने या पार्टीचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कोमलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या चिकन पार्टीचा खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांनादेखील या पार्टीत सामील करुन घेतले आहे. कोमलने शेअर केलेल्या या व्हिडीओत मालिकेतील बरेच कलाकार आहेत. तेजश्री प्रधान, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, माधुरी भारती, ऋषि राजकिरण, राज हंचनाळे, गिरीश वसईकर, उमेश घाडगे या सर्वांनी मिळून चिकन पार्टीचा मनमुराद आनंद घेतल्याचे दिसत आहे. मालिकेची पटकथा लेखिका व कवयित्री अश्विनी शेंडे हिने सर्वांसाठी चिकणची खास मेजवानी आयोजित केली होती.
दरम्यान, दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत असून मुक्ता व सागर यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांना अधिकच आवडत आहे. त्याचबरोबर मालिकेतील सई ही बालकलाकार देखील चाहत्यांचे मालिकेतील मुख्य आकर्षण आहे. तिच्या सोज्वळ अभिनयाने ती साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.