सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु असलेली दिसून येत आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार या वर्षी लग्नबंधनात अडकले. अशातच आता एक अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे हेमल इंगळे. काही दिवसांपूर्वी हेमलचा मुहूर्तमेढ सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याची खास झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली. मुहूर्तमेढ सोहळ्यावेळी हेमलने सुंदर अशी निळ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने. मुंडावळ्या व हातातील हिरवा चुडा अशा लूकमध्ये दिसून आली होती. त्यामुळे हेमलच्या लग्नाआधीच्या विधींना दणक्यात सुरुवात झाल्याचे बघायला मिळाले. अशातच आता तिने सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हेमलचा मेहंदीसोहळा बघायला मिळत आहे. (hemal ingle mehndi ceremony)
हेमलच्या घरी सध्या लग्नाची जय्यत तयारी सुरु असलेली बघायला मिळत आहे. केळवणापासून ते आता मुहूर्तमेढ संपन्न होण्यापर्यंतचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. नुकतीच हेमलची मेहंदी पार पडली. मेहंदी सोहळ्याचा सुंदर व्हिडीओ आता समोर आलेला बघायला मिळत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हेमलने सुंदर असा गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच त्यावर मॅचिंग अशी डायमंड ज्वेलरीदेखील परिधान केलेली बघायला मिळत आहे.
तसेच तिचा साधा पण आकर्षक मेकअप लक्ष वेधून घेत आहे. मेहंदीच्या वेळी ती होणाऱ्या नवऱ्याबरोबर खूप धमाल मस्ती करतानाही दिसत आहे. तसेच तिच्या हातावर सुंदर मेहंदी रेखाटली जात आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने “सुंदर मेहंदी सोहळा”, असे कॅप्शनही दिले आहे.दरम्यान या व्हिडीओ चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे हेमलचं केळवण पार पडलं. “केळवणाला दणक्यात सुरुवात”, असं म्हणत तिने सोशल मीडियावर व्हिडीओदेखील शेअर केला होता.
लग्नाआधीच्या सोहळ्यांचे फोटो व व्हिडीओ समोर आल्यानंतर अभिनेत्री लग्नबंधनात कधी अडकणार? अशी उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. मात्र अद्याप तिच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. हेमलच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती गेल्या वर्षी सचिन पिळगांवकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात दिसून आली होती.