Shivani Surve and Ajinkya Nanaware Marriage : अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. ठाण्यातील येऊर हिल येथे अत्यंत पारंपरिक अंदाजात शिवानी व अजिंक्यच्या लग्नसोहळा उरकला. नुकतेच त्यांच्या शाही लग्नसमारंभातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. काल दोघांनी ‘अखेर बंधनात’ असं म्हणत त्यांच्या साखरपुडा सोहळ्यातील अनेक फोटो शेअर करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. त्यानंतर ही जोडी लग्नबंधनात केव्हा अडकणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.
अखेर शिवानी व अजिंक्य विवाहबंधनात अडकले आहेत. यावेळी दोघांच्या लग्नाचा भव्य शाही थाटमाट पाहायला मिळाला. दोघांच्या लग्नसोहळ्यातील लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवानीने लग्नासाठी खास लूक केला असल्याचे पाहायला मिळत आहे. तिने तिच्या लग्नासाठी फिकट गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. या लेहेंग्यावर सुंदर नक्षीकामदेखील आहे. तर अजिंक्यने सफेद रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला आहे. अन् डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटादेखील परिधान केला आहे.
शिवानी-अजिंक्यच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या ‘झिम्मा २’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या चित्रपटात शिवानी सुर्वेही झळकली होती. या चित्रपटातील शिवानीच्या कामाचं बरंच कौतुक होत असलेलं पाहायला मिळालं. ‘झिम्मा २’ ची टीमने शिवानी व अजिंक्यच्या लग्नाला हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री सुहास जोशी, सायली संजीव, हेमंत ढोमे हे कलाकार शिवानीच्या लग्नाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यांत सुहास जोशी शिवानीला शुभेच्छा देण्यासाठी मंडपात येताच अभिनेत्रीने नवऱ्यासह त्यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतलेले पाहायला मिळत आहेत. शिवानीच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. तर हेमंत ढोमे व सायली संजीव यांनी मिठी मारत दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत.