मे महिन्याचा प्रत्येक शुक्रवार प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल डोस असणार आहे. यामागचं कारणंही तितकंच खास आहे. मराठीमध्ये नवनवीन चित्रपट येऊ घातले आहेत. प्रत्येक चित्रपटांमधून विविध धाटणीच्या कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘आतली बातमी फुटली’. चित्रपटाचं नाव ऐकूनच कथाही तितकीच युनिक असणार हे लक्षात येतंच. आता ‘आतली बातमी फुटली’ची एक झलक समोर आली आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याचीच सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ‘आतली बातमी फुटली’च्या टीझरला प्रेक्षकांचाही दमदार प्रतिसाद मिळत आहे. (Aatli batmi phutli Marathi movie teaser)
वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट घेऊन आले आहेत. एका खूनाची दिलेली सुपारी आणि त्यामागचं रहस्य याभोवती चित्रपटाची कथा फिरते. ही रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल म्हणजे ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट. टिझरमधून रहस्य, धमाल आणि चित्रविचित्र घटनांची मजेशीर झलक दिसत आहे.
ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, सिद्धार्थ जाधव असे मराठीतले सुप्रसिद्ध चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्याचबरोबरीने विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदी कलाकारांच्याही उत्तम भूमिका आहेत.
आणखी वाचा – ३९ वर्ष बँकेत नोकरी, ६०व्या वर्षी सेवानिवृत्ती अन्…; ‘होणाऱ सून…’मधील शशीकला सध्या काय करते?
हा कॉमेडी क्राइम चित्रपट कथेच्या प्रत्येक वळणावर प्रेक्षकांना विविध सरप्राइज देणारा आहे. ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी तर सहाय्यक दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांनी केले आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. ६ जूनला हा चित्रपट चित्रपटगृहांत दाखल होईल.