अभिनेता सोनू सूद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अशातच सध्या सुरु असणाऱ्या आयपीएलच्या चर्चांवर सोनू सूदने केलेलं भाष्य चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. सोनू सूद क्रिकेटपटूंच्या समर्थनार्थ पुढे आला असून चाहत्यांनी देशाला अभिमान मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा आदर करण्याचे आवाहनही त्याने केले आहे. नेटकरी सोनूने केलेल्या कमेंटला क्रिकेटर हार्दिक पांड्याशी जोडत आहेत, ज्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून खूप ट्रोल केले जात आहे. गेल्या वेळी कर्णधारपदाची कमान रोहित शर्माकडे होती. इतकंच नाही तर ‘आयपीएल २०२४’ सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांनी पांड्याची खिल्लीदेखील उडवली होती. (Sonu Sood Supports Hardik Pandya)
कोणत्याही खेळाडूचे नाव न घेता अभिनेता सोनू सूदने ट्विटरवर खास पोस्ट शेअर केली आहे. “आपण आपल्या खेळाडूंचा आदर केला पाहिजे. ज्या खेळाडूंनी आम्हाला अभिमान वाटावा असं काम केलं, ज्या खेळाडूंनी आपल्या देशाचा गौरव केला. एके दिवशी तुम्ही त्याचा जयजयकार करता, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्यावर टीका करता”, असं म्हटलं.
We should respect our players. Players who made us proud, players who made our country proud. One day you cheer for them, next day you boo them.
— sonu sood (@SonuSood) March 29, 2024
It’s not they, it’s us who fail.
I love cricket.
I love every cricketer who represents my country.
Doesn’t matter which franchise…
सोनू सूदने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “ते नाही तर आपणच अपयशी ठरतो. मला क्रिकेट हा खेळ आवडतो. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक क्रिकेटपटू मला आवडतो. तो कोणत्या फ्रेंचायझीसाठी खेळतो हे महत्त्वाचे नाही. तो कर्णधार म्हणून खेळतो किंवा संघातील १५वा खेळाडू म्हणून खेळतो याने काही फरक पडत नाही. तो आमचा हिरो आहे”.
हार्दिक पांड्या याआधी गुजरात टायटन्सकडून खेळायचा, मात्र यावेळी त्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सोनू सूदबद्दल बोलायचे झाले तर तो ‘फतेह’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या चित्रपटात सोनू सूदबरोबर जॅकलिन फर्नांडिस आहे. ‘फतेह’ यावर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.