अलीकडे एखाद्या चित्रपट किंवा मालिकेसाठी ऑडिशन घेतली जाते. या ऑडिशनमधून कलाकारांचे त्या चित्रपट किंवा मालिकेसाठीच्या निवडीबाबत अंतिम निर्णय घेतला जातो. या अंतिम निर्णयात त्या चित्रपट किंवा मालिकेतील कोणता कलाकार त्या भूमिकेसाठी योग्य आहे हे ठरवले जाते. याच ऑडिशनबद्दल अनेक कलाकारांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. मनोरंजन क्षेत्रात इतके काम केले असूनही काही दिग्दर्शक ऑडिशन घेतात? ही गोष्ट काही कलाकारांना पटत नाही. याबद्दल अनेक कलाकारांनी आपपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मात्र काही दिग्दर्शक एखाद्या कलाकाराचे ऑडिशन न घेताच एखाद्या भूमिकेसाठी निवड करतात. यापैकीच एक कलाकार म्हणजे रवी काळे. रवी यांनी आजवर मराठी, हिंदी, तेलुगू व तमिळ या भाषांमधील अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘सरकार’, ‘सरकार राझ’ यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिका त्यांना ऑडिशनशिवाय मिळाल्या होत्या. याबद्दल रवी काळे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – तितीक्षा तावडे तिच्या मुलांनाही ‘सातव्या मुलीची…’ची गोष्ट सांगणार, म्हणाली, “नेत्राची गोष्ट…”
रवी काळे यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली तेव्हा या मुलाखतीत त्यांनी ऑडिशनबद्दल त्यांचं स्पष्ट मत मांडलं. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “‘सरकार’ चित्रपटातील भूमिका मला ऑडिशनशिवाय मिळाली होती. आजच्या हिंदी इंडस्ट्रीतला असा कोणता दिग्दर्शक आहे, जो मला त्यासारखा चित्रपट किंवा तशी भूमिका देईल. आहे का तसा कुणी? औकात आहे का कोणाची? नाही. माफ करा. पण नाही आहे”.
आणखी वाचा – “बिहारमध्ये येऊ देणार नाही”, झहीर इक्बाल लग्न केल्यानंतर सोनाक्षी सिन्हाला धमकी, पोस्टरही लावले अन्…
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “दिग्दर्शकांना माझा थेट प्रश्न आहे. तुम्हाला नट कळतात का? अभिनेता म्हणजे काय ते तुम्हाला कळतं का? आज मी दक्षिण सिनेसृष्टीत भावनिक, विनोदी, खलनायक अशा सगळ्याच भूमिका करतो. ते (दाक्षिणात्य दिग्दर्शक) आमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्ही (हिंदी दिग्दर्शक) आमच्याकडे ऑडिशन मागता? कोण आहात तुम्ही? तुमच्याशिवाय हे जग चालायचं राहणार आहे? असं तुम्हाला वाटतं का? तर तसं अजिबात नाही”.