मराठीतील अनेक कलाकार हे कामानिमित्त मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक किंवा महाराष्ट्रातील काही इतरत्र ठिकाणी प्रवास करत असतात. वेळेसाठी बऱ्याचदा हा प्रवास ते त्यांच्या वैयक्तिक वाहनांनी नव्हे तर सार्वजनिक वाहनांनी करत असतात आणि या प्रवासादरम्यान त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभव येत असतात. असाच काहीसा अनुभव ज्येष्ठ अभिनेत्री विद्या करंजीकर यांना आला आहे. काही कामानिमित्त त्या नाशिकला गेल्या असताना नाशिकहून मुंबईत येण्यासाठी त्यांनी खाजगी गाडीचा पर्याय निवडला. मात्र त्याचा त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी नेमकं काय घडलं?, याचा सविस्तर व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी असं म्हटल आहे की, “काल मी नाशिकहून मुंबईला आले. येताना मुंबई नाक्यावरती एका सीटवर एक प्रवासी घेऊन जाणाऱ्या ज्या खाजगी गाड्या असतात तिथे मी उभी होते. तेव्हा अर्ध्या तासाने तिसरा प्रवासी आला आणि चौथ्या प्रवश्याची आम्ही वाट बघत होतो. तेवढ्यात एक माणूस बास्केटमध्ये कुत्र्याचं पिल्लू घेऊन आला आणि आमची गाडीमध्ये व्यवस्था करणाऱ्या माणसाबरोबर काहीतरी बोलला. इतक्यात तो ड्रायव्हर चला चला म्हणून ओरडायला लागला. इतक्यात त्याने त्या कुत्राच्या पिल्लाला गाडीमध्ये ठेवलं तर मी त्याला म्हटलं की यांच्याबरोबर कुणी येणार नाही का? त्यावर तो माणूस म्हणाला नाही, फक्त हे पिल्लूच तुमच्याबरोबर येणार आहे, पुढे माझा एक माणूस त्याला घेईल. यानंतर मी त्याला त्याच्या खाण्या-पिण्याबद्दल विचारलं. त्यावर तो माणूस बोलला की त्याला आत्ताच खायला वगैरे दिलं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. यावर आम्ही नेहमी असं करतो तुम्ही काय चिंता करू नका असंही म्हणाला. दरम्यान, मलाही मुंबईला येण्याची घाई होती. त्यामुळे मी त्याला अजून काही बोलली नाही. यानंतर गाडी हायवेला लागताच खड्ड्यामधून जाताना ते पिल्लू ओरडत होतं. याबद्दल मी त्या ड्रायव्हरला तू या पिल्लाला घेतलसच का? तू त्या माणसाला नाही म्हणायला हवं होतं असं म्हटले. तर त्यावर त्या ड्रायव्हरनेदेखील मी काय करू मॅडम मी ड्रायव्हर आहे. कालपासून नाशिकमध्ये आहे. मुंबईला जाण्यासाठी नाईलाज म्हणून मी त्याला आपल्याबरोबर घेतलं.
त्यानंतर त्या पिल्लाला जो माणूस घ्यायला येणार होता, त्याची आम्ही वाट बघितली पण तो खूप वेळ आलाच नाही. शेवटी माझी सहनशक्ती संपली आणि मी जवळच्याच एका पोलीस चौकीमध्ये गेले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यावर पोलीस म्हणाले, गाडी तुमची आहे का? तर मी म्हटल नाही मी फक्त प्रवासी आहे. तर ते म्हणाले तुम्ही का तक्रार करताय? त्या ड्रायव्हरने तक्रार करायला हवी. तर मी म्हटलं मला याचा त्रास सहन करावा लागतो आणि मला लवकरात लवकर पोहोचायचं आहे, त्यामुळे मी तुमच्याकडे तक्रार करत आहे. तुम्ही ते कुत्र्याचं पिल्लू तुमच्या ताब्यात घ्या आणि आम्ही त्या माणसाला सांगतो तो तुमच्याकडून त्या पिल्लाला घेईल.
आणखी वाचा – ‘हा’ आहे मकरंद अनासपुरे यांचा आगामी चित्रपट, कोकणात शूटिंगला सुरुवात
त्यावर तो पोलीस म्हणाला, नाही मॅडम असं काही होत नाही. त्यानंतर पोलिस माझ्याबरोबर गाडीजवळ आले आणि त्याने उबर ड्रायव्हरला ओरडायला सुरुवात केली. त्याचं लायसन्स पाहिलं. फोटो काढला. नंबरप्लेटचा फोटो वैगरे काढून घेतला आणि नंतर चला इथे अर्धा तासापेक्षा जास्त थांबायचं नाही. तो जो कोणी माणूस आहे, त्याला फोन करुन बघा नाहीतर पुढे पालिकेचे ऑफिस आहे तिकडे ते कुत्र्याचं पिल्लू द्या. आम्ही कुत्र्याचं पिल्लू इथे ठेवत नाही. त्यावर मी त्याला आम्हाला घाई आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही आम्हालाच काय कामाला लावताय. त्यावर तो पोलीस म्हणाला, मग तुम्ही आम्हाला कामाला का लावताय, हे काय आमचं काम आहे का? असं म्हणाला. यानंतर थोडे पुढे जाताच त्या माणसाचा ड्रायव्हरला फोन आला तेव्हा मी त्याच्याशी बोलले आणि त्याला ओरडले. मग काही वेळाने तो माणूस आला आणि तो त्या पिल्लाला घेऊन गेला.”
यापुढे त्यांनी या व्हिडीओत ‘पेटा’ संस्थेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून “या अशा छोट्याशा पिल्लाला असं एका पॅसेंजरचे पैसे भरुन पाठवून देतात. ते असं नेहमी करतात असंही ते बोलत होते. तर हे असं चालतं का? मला याचं फार आश्चर्य वाटतंय. मला याबद्दल तक्रार नोंदवायची आहे, त्यामुळे मला कृपया मार्गदर्शन करा” असे म्हटले आहे. दरम्यान त्यांच्या या व्हिडीओखाली अनेकांनी घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला असून विद्या यांना तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर त्यांच्या या कृतीचे कौतुकही होत आहे.