‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षक या मालिकेच्या प्रेमात होते. कालांतराने बदललेल्या या कथानकाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. जयदीप-गौरी, नित्या-अधिराज या पात्रांबरोबर माई हे पात्रही महत्त्वपूर्ण होतं. अशातच या पात्राने नुकताच मालिकेचा निरोप घेतला असल्याचं समोर आलं आहे. अलीकडच्या एपिसोडमध्ये माईचा दुर्दैवी अंत दाखवण्यात आला. (Varsha Usgaonkar Bigg Boss Marathi)
मालिकेत माई हे पात्र ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर साकारत आहे. वर्षा यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून एक्झिट घेतली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल पेजवरुन शेअर केला आहे. मालिका सोडल्यानंतर वर्षा ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार का?, अशी सध्या चर्चा सुरु झाली आहे.
‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन येत्या २८ जुलैपासून सुरु होणार आहे. २८ तारखेला या शोचा ग्रँड प्रीमियर होणार असून त्यानंतर १०० दिवस ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात स्पर्धकांचा खेळ सुरु होईल. यंदाचा हा नवा सिझन अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरुन वर्षा यांच्या मालिकेच्या एक्झिटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टखाली नेटकऱ्यांनी कमेंट करत ‘बिग बॉस’ मराठीमध्ये त्या दिसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
“माई आता बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये दिसतील”, “तुम्ही आता BBM5 मध्ये चालल्या आहात ना?”, “‘बिग बॉस’मध्ये तुमचं स्वागत आहे”, “शालिनीचा शेवट होताना माई तुम्ही पाहिजे होता पण जाऊद्या आता आम्ही ‘बिग बॉस’मराठीमध्ये पाहू”, अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी करत वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस’मराठीमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं आहे.