मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वंदना यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. वंदना गुप्ते या सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. वंदना गुप्ते यांच्या बाईपण भारी देवा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड केली. या चित्रपटातील वंदना यांच्या भूमिकेमुळे त्या बऱ्याच चर्चेत आल्या. चित्रपटांबरोबरच वंदना रंगभूमीवर सक्रिय असतात. (Vandana Gupte Incident)
गेली अनेक वर्ष त्या अभिनयक्षेत्रात कार्यरत असून प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. वंदना यांनी नुकतीच ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगितला. वंदना यांनी आजवर अनेक नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या आहेत. अशाच एका नाटकादरम्यानचा गमतीशीर किस्सा त्यांनी यावेळी बोलताना सांगितला आहे. हा किस्सा सांगतानाचा व्हिडीओ ‘झी मराठी’ वाहिनीच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.
हा किस्सा सांगत त्या म्हणाल्या, “मी ‘प्रेमाच्या गावा जावे’ हे नाटक करत होते. तेव्हा कोकण दौरा असायचा. तेव्हा चित्रपटगृह ही मोकळ्या जागेत असायची. कोकणात एका प्रयोगादरम्यान जिथे प्रयोग होता त्या स्टेजच्या मागे आंब्याचं झाड होतं. नाटक सुरु झालं. स्टेजवर मी, अरविंद देशपांडे आणि निवेदिता सराफ होतो. आमच्या तिघांचा स्टेजवर संवाद सुरु असताना आणि पहिल्या अंकाचा पडदा पडायच्या आधी नेमका एक आंबा समोर पडला. आणि नेमकी त्यावेळी माझी एक्झिट घ्यायची वेळ होती. आणि मी एक्झिट घेतली की निवेदिता तो आंबा उचलणार म्हणून मीच तो आंबा उचलून मग एक्झिट घेतली”.
पुढे त्या म्हणाल्या, “नाटक संपल्यानंतर अरविंद देशपांडेंनी माझी चांगलीच खरडपट्टी केली. नाटक सुरु असताना तू भूमिकेच्या बाहेर जाऊन आंबा का उचललास, इतका हावरटपणा कशाला केलास, असं बरंच ते मला बोलले. मी सुद्धा त्यांचं बोलणं ऐकून घेतलं. ते ओरडत होते तोपर्यंत मी शांतपणे आंबा सोलत होते. आंब्यांचे तुकडे केले आणि ते त्यांनाही दिले आणि मी खाल्ले. त्यानंतर मी त्यांना गमतीत म्हणाले, की तुम्ही जो आता आंबा खाताय तो स्टेजवर पडलेलाच आंबा आहे”. वंदना यांनी याआधी देखील बऱ्याच मुलखातींमध्ये अनेक किस्से सांगितले आहेत. स्पष्टवक्ती आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून त्यांची सिनेसृष्टीत ओळख आहे.