सध्या कलाकार मंडळी एकामागोमाग एक आनंदाची बातमी चाहत्यांसह देताना दिसत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सई लोकूर हिनेदेखील चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. १७ डिसेंबर २०२३ रोजी सईने चिमुकल्या बाळाला जन्म दिला. सई आई झाली असून तिने तिच्या लेकीचं स्वागतही केले आहे. सई व तीर्थदीप रॉय हे आता आई-बाबा झाले आहेत. आई-बाबा झाल्यानंतर दोघेही त्यांच्या कामाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढत त्यांच्या लेकीबरोबर वेळ घालवताना दिसतात. सोशल मीडियावरुन सई नेहमीच तिच्या बाळाबरोबरचे व्हिडीओ शेअर करताना दिसते. (Sai Lokur Answers To Trollers)
सईने अद्याप तिच्या लेकीचं चेहरा दाखवलेला नाही. नेहमीच ती तिच्या लेकीबरोबर खेळतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. अशातच सईने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये सई तिच्या लेकीला म्हणजेच ताशीला गाणी म्हणून दाखवत आहे. मात्र ही गाणी इंग्रजी भाषेत शिकवत असल्याने अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी सुनावलं असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत सईला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या नेटकऱ्यांच्या प्रश्नांना सईने उत्तरही दिलेलं पाहायला मिळत आहे.
सई गरोदरपणात वाढत्या वजनामुळे बरीच ट्रोल झाली. मात्र यावर ती शांत राहता ट्रोलर्सला उत्तरही देताना दिसली. अशातच आता सई तिची लेक ताशीला इंग्रजी भाषेत गाणी गाऊन दाखवताना दिसत आहे. हे पाहून नेटकऱ्यांनी मराठी भाषेत तिला आधी शिकव असा सल्ला दिला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत, “मराठीमध्ये सांग तिला खूप लवकर कळेल. नंतर इंग्लिश भाषेतच शिकायचं आहे”, असं म्हटलं. यावर उत्तर देत सई म्हणाली, “मी सगळ्या भाषेत गाते. इंग्रजी, मराठी, हिंदी आणि बंगालीसुद्धा. जितक्या जास्त भाषा ऐकतात तितकंच ते जास्त शिकतात”.
या व्हिडीओवर आणखी एका युजरने, “तू मराठी अभिनेत्री आहेस विसरु नकोस. आपली मराठी भाषा पहिली”, असं म्हटलं. यावर उत्तर देत ती म्हणाली, “पुढची रीलही मराठीत असेल”, असं म्हटलं. तर काही चाहत्यांनी “बाळाचा चेहरा कधी दाखवणार”, अशा कमेंट केल्या आहेत.