हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्याच्या जीवनात गुरूची कमतरता आहे तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही. कारण आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवण्यात गुरुचा मोठा हातभार असतो. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी आपण गुरूंना वंदन करुन त्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त करतो. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने गुरुपौर्णिमेनिमित्त शेअर केलेली खास पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. (Urmila Kothare Post)
ही अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे. उर्मिलाने आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट, नाटक यांमधून महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी निरोप घेतलेल्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. याशिवाय उर्मिला उत्तम नृत्यांगना आहे हे साऱ्यांना ठाऊक आहे. आजवर उर्मिलाने तिच्या नृत्यकलेनेही प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सोशल मीडियावरही उर्मिला बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच गुरुपौर्णिमेच्या या खास दिवशी उर्मिलाने तिच्या गुरु श्रीमती आशा जोगळेकर यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
नृत्य शिकवतानाच्या आठवणी शेअर करत उर्मिलाने असं म्हटलं आहे की, “गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! माझ्या गुरू स्वर्गीय श्रीमती आशा जोगळेकर (मावशी) यांच्या बरोबरची काही मोजकी क्षणचित्रे. गुरू हा फक्त शिकवत नाही तर आपल्याला घडवतो. माझ्या आई वडिलांनंतर जर मला कोणी घडवलं असेल तर ते मावशीने. मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजते की, मला मावशीच्या रूपात, एक निस्वार्थी, निर्मल त्याचबरोबर एक शिस्तबद्ध गुरू लाभला. यासाठी मी कायम देवाचे खूप खूप आभार मानते.
पुढे तिने असेही लिहिले आहे की, “तुम्ही जिथे कुठे असाल, मावशी तिथून तुम्ही मला सतत आशीर्वाद देत आहात याची मला खात्री आहे. तुमची उणिव सतत भासत राहणार आहे आयुष्यभर”, अशी भावुक पोस्ट शेअर केली आहे.