अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे लग्न लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांपासून ते मुख्य समारंभापर्यंत एक भव्यदिव्य सोहळा होता. हा सोहळा अगदी थाटामाटात संपन्नही झाला. अंबानी कुटुंबाने जगभरातील मर्यादित पाहुण्यांना आमंत्रित केले. अभिनेते, अभिनेत्री, व्यावसायिक व्यक्ती आणि अगदी पंतप्रधानांसह जगभरातून सुमारे १४ हजार पाहुण्यांना या विलक्षण उत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या आदरणीय पाहुण्यांनी अनंत व राधिकासाठी आशीर्वादस्वरुपी खास भेटवस्तूही दिल्या. या प्रख्यात पाहुण्यांनी अनंत व राधिकाला त्यांच्या या खास दिवशी नेमक्या काय भेटवस्तू दिल्या याबाबत जाणून घेऊया. (Anant Ambani Radhika Merchant gifts)
अनंत अंबानीचे आई-वडील नीता व मुकेश अंबानी यांनी नवविवाहित जोडप्याला पाम जुमेराह येथे ३००० चौरस फुटांचे घर भेट म्हणून दिले आहे. ज्याचे मूल्य रु. ६४० कोटी इतके असल्याचं समोर आलं आहे. त्यात १० बेडरुम व एक खासगी बीच आहे. याशिवाय त्यांनी अनंतला ५.४२ कोटी रुपयांची बेंटले कॉन्टिनेंटल जीटीसी स्पीड कार आणि राधिकाला १३० कोटी रुपये किमतीचे दागिनेही भेट दिले.
अनंत व राधिकाच्या लग्नाला बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. ‘बॉलीवूडलाइफ’च्या रिपोर्टनुसार, कतरिना कैफ व विकी कौशल यांनी अनंत-राधिकाला त्यांच्या लग्नात १९ लाख रुपयांची सोन्याची चैन भेट दिली. तर अक्षय कुमारने ६० लाख रुपये किमतीचा सोन्याचा पेन दिला. शाहरुख खानने फ्रान्समध्ये ४० कोटी रुपये किमतीचे आलिशान अपार्टमेंट गिफ्ट केले आहे. तर बच्चन कुटुंबाने ३० कोटी रुपयांचे नेकपीस दिले आहे. तसेच सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीने २५ लाख रुपये किमतीची हाताने बनवलेली शाल त्यांना भेट दिली. आलिया भट्ट व रणबीर कपूरने या जोडप्याला ९ कोटी रुपयांची मर्सिडीज कार दिली. तर रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांनी २० कोटी रुपयांची कस्टमाइज्ड रोल्स रॉयस कार भेट दिल्याचे बोलले जात आहे. सलमान खानने अनंतला १५ कोटी रुपयांची स्पोर्ट्स बाईक भेट दिली.
इतकंच नव्हे तर परदेशी पाहुणे ॲमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी या जोडप्याला ११.५० कोटी रु. किमतीची बुगाटी भेट दिली. तर अमेरिकन अभिनेता जॉन सीनाने त्यांना ३ कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी कार भेट भेट म्हणून दिली आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांना ३०० कोटी रुपयांचे खासगी जेट पाठवले आहे. तर बिल गेट्स यांनी ९ कोटी रुपयांची हिऱ्याची अंगठी आणि १८० कोटी रुपयांचे आलिशान यॉच भेट दिले आहे. याशिवाय सुंदर पिचाई यांनी त्यांना १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर भेट दिले. तर इवांका ट्रम्प यांनी नवविवाहित जोडप्याला अमेरिकेत ८० कोटी रुपयांचे आलिशान घर दिले आहे.