खुशबू तावडे आणि तितीक्षा तावडे या दोघी मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत, त्याचबरोबर या दोघी सख्ख्या बहीणीही आहेत. सोशल मीडियावरील फोटो व व्हिडीओमधून या दोन्ही बहिणींचा खास बॉण्ड पाहायला मिळतो. दोघी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात आणि या दोघी एकमेकींबरोबरचे खास फोटोही शेअर करत असतात. त्याच्या या फोटोला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. यापैकी अभिनेत्री खुशबू तावडेने नुकतीच गुडन्यूज दिली. २ ऑक्टोबर रोजी खुशबूने एका गोंडस मुलीला जन्म दिला. खुशबूची सहअभिनेत्री वैशाली भोसलेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे खुशबूला मुलगी झाल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर नुकताच खुशबूने आपल्या लेकीबरोबचा खास फोटो शेअर केला असून लेकीचे नावही सांगितले आहे. (Titeeksha Tawde Vlog)
खुशबूने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पती संग्राम साळवी, मुलगा राघव आणि आपल्या गोंडस लेकीबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे. खुशबूने आपल्या लाडक्या लेकीचे नाव ‘राधी’ असं ठेवलं आहे. अशातच आता खुशबूची बहीण व अभिनेत्री तितीक्षा तावडेने खुशबूच्या मुलीच्या जन्मदिवसाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. तितीक्षा तावडे ही युट्यूबवरील व्लॉगच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील काही खास क्षण आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच तिने खुशबूला मुलगी झाल्याचे क्षण आपल्या व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
आणखी वाचा – खुशबू तावडेने पहिल्यांदाच शेअर केला लेकीचा सुंदर फोटो, नावही आहे खूप खास, पोस्ट पाहून कौतुकाचा वर्षाव
तितीक्षाने तिच्या युट्यूब व्हिडीओच्या दिवशी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती खुशबूच्या मुलीच्या जन्मासाठी उत्सुक असल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर व्हिडीओमध्ये पुढे तिला खुशबूचा नवरा म्हणजेच अभिनेता संग्राम साळवी फोन करत मुलगी झाल्याचे सांगतो. यानंतर तितीक्षा भावुक होते. मावशी झाल्याची गुडन्यूज ऐकताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. यानंतर तितीक्षा सिद्धार्थ, आई-वडील, भाऊ व मित्रमैत्रिणींना फोन करत खुशबूच्या मुलीच्या जन्माबद्दलची खुशखबर देते. या फोनकॉल्स दरम्यान तितीक्षा खूपच आनंदी असल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
त्यानंतर व्हिडीओच्या शेवटी तितीक्षा व सिद्धार्थ एकत्र खुशबूला भेटायला जातात. यादरम्यान, दोघेही बाळाला व बाळाच्या आईला भेटण्यासाठी खूपच उत्सुक असतात. यावेळी ते दोघे बाळासाठी खास भेटवस्तूही घेऊन जातात. पुढे दोघे खुशबूच्या बाळाची भेट घेतात आणि यावेळी बाळाला पाहून दोघांनाही अतिशय आनंद झाल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. दरम्यान, खुशबूने शेअर केलेल्या या व्लॉगला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.