महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे निकाल काल (२३ नोव्हेंबर) रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १२८ उमेदवार उभे केले होते, पण पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही. (Tejaswini Pandit On Raj Thackeray)
ज्या दादर-माहिम मतदारसंघामध्ये शिवसेना रुजली, तिथे ठाकरे घराण्यातून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर माहिममध्ये शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) गटाच्या महेश सावंत उभे होते, शिवाय भाजपच्या सदा सरवणकरदेखील या लढतीत होते. अनेकांना मनसेमधून अमित ठाकरेंचा विजय होईल, याची उत्सुकता होती. पण अखेर महेश सावंत यांनी बाजी मारली. एकूणच या निवडणुकीतही राज ठाकरेंच्या नशिबी निराशाच आली. यंदाच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंना मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही पाठींबा दिला होता. मनसे आणि राज ठाकरे यांना जाहीर पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तेजस्विनी पंडित.
तेजस्विनीने तिच्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत राज ठाकरेंना पाठींबा दिल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता निवडणुकीच्या निकालावर अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तेजस्विनीने तिच्या स्टोरीवर राज ठाकरेंचा फोटो पोस्ट करत “विजयी उमेदवारांचं अभिनंदन! कोण? कसं? आणि काहीजण का नाही? हे अनुत्तरीत राहिल, त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटला १००/१००. पण तरीही… राजसाहेब ठाकरे” असं म्हटलं आहे. तसंच एकनिष्ठ व सदैवसोबत हे हॅशटॅग देत तिने “आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा – खोटं रक्त, खोटी जखम अन्…; असा शूट झाला ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील ‘तो’ सीन, लीलाने दाखवली खास झलक
दरम्यान, निवडणुकीच्या निकालात महायुतीने मोठी मुसंडी मारली. महायुतीचा हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक विजय आहे. तर मनसेला आपलं खातंही उघडता आलं नाही. त्यामुळे या निकालावर राज ठाकरेंनी केवळ तीन शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर “अविश्वसनीय! तूर्तास एवढेच…”, अशी पोस्ट शेअर केली होती.