सध्या देशभरातून सुन्न करणाऱ्या बातम्या कानावर येत आहेत. महिला असुरक्षित असल्याच्या अनेक घटना कानावर येत आहेत. एकामागोमाग एक या घटना कानावर आल्याने साऱ्यांना धक्का बसला आहे. नुकतंच बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर लैगिक अत्याचार करण्यात आले. या बातमीने महाराष्ट्रात खळबळ पसरली. त्या आधी कोलकाता येथे डॉक्टरचा बलात्कार करुन हत्या कऱण्यात आली त्यामुळे देशभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं. तर कोल्हापुरातही १० वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. (Tejashri Pradhan angry post)
बदलापुरात झालेल्या या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. २० ऑगस्टला बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. संतप्त मंडळी शाळेची तोडफोड करताना पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी रेलरोको आंदोलन केलं. नराधमाला फाशी द्या असा नारा लागवण्यात आला. बदलापूर प्रकरण ताजे असतानाच आता अंबरनाथमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथमधील ३५ वर्षीय नराधमाने नऊ वर्षांच्या मुलीचा शौचायलात विनयभंग केल्याचं उघडकीस आलं.

मुलीच्या शेजारी राहणाऱ्या या नराधमाने मुलीला शौचालयात नेऊन तिला अश्लील चित्रफित दाखवत तिच्यावर विनयभंग केला. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. संतोष कांबळे असं आरोपीचं नाव आहे. या नराधमाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अभिनेत्री तेजश्री प्रधानने संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
“अजून किती वेळानंतर या नराधमांना शिक्षा मिळणार. आता समाजात भीती पेरायची वेळ आली आहे. जागे व्हा”, असं म्हणत तेजश्रीने पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला आहे. समाजात घडणाऱ्या या गोष्टी लक्षात घेत केवळ नागरिकांनी नाही तर कलाकार मंडळींनीही राग व्यक्त केला आहे. अभिजीत केळकर, तेजस्विनी पंडित, प्रसाद ओक, शिवाली परब, सोनाली कुलकर्णी, अक्षय केळकर, मृण्मयी देशपांडे, प्रिया बापट या कलाकारांनीही पोस्ट शेअर करत राग व्यक्त केलेला पाहायला मिळाला.