कलाकार मंडळी जेव्हा चित्रीकरणानिमित्त बरेचदा घरापासून त्यांच्या कुटुंबापासून दूर असतात. बऱ्याच अशा महिला कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या तान्ह्या बाळांना घरी ठेवून शूटिंगला जावं लागतं. मात्र कधीही कोणतीही तक्रार न करता त्या ताकदीने, खंबीरपणे प्रत्येक आव्हानांना सामोऱ्या जातात. अशीच एक खमकी अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे. अनेक कठीण प्रसांगाना सामोरी जात सुरभीने सिनेसृष्टीत आपलं स्वतःच असं स्थान निर्माण केलं. आजवर सुरभीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. मात्र एक आई म्हणून तिच्या बाळाला बरं नसताना तिच्यावर ओढवलेल्या एका प्रसंगाबाबत तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Surabhi Bhave Emotional)
सुरभी भावेने ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीत भाष्य केलं. यावेळी बोलताना सुरभीने मन थक्क करणारा एक प्रसंग सांगितला. सुरभी हा प्रसंग शेअर करत म्हणाली, “आमच्या घरात लग्नकार्य होतं म्हणून मी सुट्टी घेतली होती. त्याचवेळी अचानक माझ्या मुलीला ताप आला. एक महिनाआधी मी ती तारीख मागून घेतली होती. खूप जवळच्या नातेवाईकांचा लग्न होतं त्यामुळे जावंच लागणार होतं. आणि त्याचदिवशी तिला ताप आला. मी म्हटलं चला लग्नाला जाऊ शकत नाही तर किमान तिच्याबरोबर तरी मला थांबता येईल. आणि तेव्हा अचानक फोन आला की टेलिकास्ट अडकतंय तुम्हाला यावंच लागेल”.
“हे ऐकल्यावर मी म्हटलं तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? मग मी म्हटलं, ठीक आहे. मी खूप प्रोफेशनल आहे. मी येणार आणि मी एकदाही तुम्हाला विचारणार नाही की मला कधी घरी सोडताय. तुमच्यातील माणूस जागा असेल तर लवकर सोडलात तर उत्तम. मी त्यादिवशी तिच्यासाठी म्हणून चार वेगवेगळ्या कामाला बायका ठेवल्या होत्या. तसेच माझ्या सासूबाईही आल्या होत्या. इतकंच नव्हे तर माझ्या शेजारीही त्यांच्या हातातली काम टाकून सान्वीबरोबर होत्या”.
“मी तेव्हा तिच्याजवळ नव्हते. तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की, बहुतेक मी कोणाची गुलाम आहे की काय. त्या दिवशी मी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत शूट केलं आणि मी रात्री ११ वाजता घरी आले तेव्हा माझी मुलगी १०३ तापाने फणफणत होती. त्याक्षणी मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले”.