सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांना कित्येकदा कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. अनेकदा ते या विषयावर खुलेपणाने भाष्य करतात तर काहीजण या विषयावर भाष्य करणं टाळतात. असाच कास्टिंग काऊचचा अनुभव एका मराठमोळ्या अभिनेत्रीलाही आला होता. ती अभिनेत्री म्हणजे छोट्या पडद्यावर खलनायिकेची भूमिका साकारणारी सुरभी भावे. या अभिनेत्रीने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने सिनेसृष्टीत स्वतःच असं स्थान निर्माण केलं. नुकतीच सुरभीने इट्स मज्जाच्या मज्जाचा अड्डा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना सुरभीने तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला. (Surabhi Bhave On Casting Couch)
कास्टिंग काऊचचा अनुभव सांगत सुरभी म्हणाली, “एक मुलगा माझ्या ओळखीतला होता तो मला म्हणाला आम्हा मुलांना मुलींचं आयुष्य उध्वस्त करायला दहा मिनिट पुरेशी आहेत, तुमचे वडील पण नाहीत तुमचं रक्षण करायला या भाषेत तो जमलेल्या अनेक लोकांच्या समोर बोलला. मी सैनिकी शाळेतून शिक्षण घेतलं आहे त्यामुळे काय केलं की काय होत हे आम्हाला शिकवलं आहे. त्यामुळे मी आधी गेले आणि तिथे एक ज्येष्ठ व्यक्ती होती त्यांना मी सांगितलं की मी याला आता सोडणार नाही आहे, तेव्हा त्यांनीही मन हलवून होकार दिला. आणि मी गेले आणि त्यांच्या सरळ मानेला पकडलं, त्याला जसं मी पकडलं तेव्हा त्याला धक्काच बसला, आणि तिथेच तो अर्धमेला झाला”.
“बाजूलाच एक लोखंडी रॉड होता, तो घेतला आणि म्हटलं रॉड दितोसच आहे तर घेऊन मारूया सटासट. आणि मी त्याला तेव्हा म्हटलं, इथून पुढे कोणत्याही मुलीशी बोलताना दहा वेळा विचार करशील, आणि रक्षणाचं बोलायचं झालं तर मुली स्वतःच रक्षण करूच शकतात. याशिवाय एक असाच किस्सा सायन स्टेशनला घडला आणि आणि दोन पुण्यात. आणि इंडस्ट्रीमध्येही मला असा अनुभव आला होता, ती व्यक्ती असिस्टंट डिरेक्टरच्या भूमिकेत होता. तर तो जवळ यायचा आणि सांगायचं मॅम इथे (खांद्याला) मार्क आहे तुमचा. आणि हे तो हात लावून सांगायचा”.
“एकदा मी त्याला बजावलं, मला हात लावून नाही सांगायचं. हे दुसऱ्या, तिसऱ्या आणि मग चौथ्यांदा झालं. तेव्हा मी संपूर्ण युनिटसमोर त्याला ओरडून म्हटलं, एकदा सांगितलं ना हात नाही लावायचा माझ्या अंगाला. ही फालतुगिरी माझ्याजवळ नाही चालणार. त्यावेळी माझी ही कृती पाहून दोन सहकलाकार मला येऊन बोलल्या, काय कमाल आहेस गं. तो रोज येऊन आम्हाला नको तिथे टच करतो. यावर मी म्हटलं हे तुम्हाला आवडत का? त्यावर त्या म्हणाल्या, नाही. मग मी म्हटलं, मग तुमचे मुद्दे, तुमचं स्पष्ट मत मांडा. एकतर तुम्हाला ते आवडतंय म्हणून सारखं येऊन तो टच करतोय. आणि वडिलांच्या निधनानंतर मी अधिक खंबीर झाले”.