अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंच आहे. सुप्रिया पाठारे या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या नव्या व्यवसायामुळेही चर्चेत असतात. सुरुवातील फूड ट्र्कपासून सुरु केलेल्या या व्यवसायाने हॉटेल पर्यंत धाव घेतली आहे. सुप्रिया यांनी त्यांच्या लेकासह मिळून ‘महाराज’ हे नवं हॉटेल सुरु केलं आहे. अनेक कलाकार मंडळी त्यांच्या या हॉटेलला भेट देत असतात. दरम्यान त्यांच्या या हॉटेलमध्ये कलाकारमंडळी पदार्थांचा आस्वाद घेतानाचे अनेक फोटोही सोशल मीडियावरून पोस्ट करण्यात आले आहेत. (Supriya Pathare Video)
मात्र सध्या सुप्रिया पाठारे यांच्या ‘महाराज’ या हॉटेलची एक वेगळीच चर्चा सुरु आहे. हे हॉटेल बंद झालं आहे, अशा अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या. यावर आता थेट सुप्रिया पाठारे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. सुप्रिया पाठारे यांनी हॉटेल काही दिवस बंद का होतं, याचं स्पष्टीकरण देत एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यांच्या हॉटेलबद्दल अफवा पसरवणाऱ्यांची कानउघडणी केली आहे.
सुप्रिया पाठारे यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “तुम्हा सगळ्यांना माहित आहे आपलं ‘महाराज’ हॉटेल केवडा सर्कल, रामजी हॉटेल समोर ठाणे येथे आहे. या हॉटेलमध्ये पावभाजी स्पेशल मिळते. तुम्ही सगळ्यांनी येऊन आस्वादही घेतला आहे हे आम्हा सर्वांनाच माहित आहे. बऱ्याचश्या गोष्टी आमच्या कानावर आल्या, फोनही आले की, त्यांना असं कळलं हे हॉटेल बंद झालं आहे, बऱ्याच जणांना असं सांगण्यात आलं. पण असं काहीच नाही आहे. २१ तारखेला माझी आई गेली. त्यामुळे आम्ही हॉटेल बंद ठेवलं होत. आता काल तिचं कार्य झालं. आणि त्यातून जरा मोकळे होत, व्यवसाय आहे तो सुरूच ठेवायला हवा म्हणून आजपासून हे हॉटेल खवय्यांसाठी सुरु करतोय. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, महाराज हॉटेलला नक्की येऊन पावभाजीचा आस्वाद घ्या.”

त्यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. बऱ्याच कलाकारांनीही त्यांचा हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी हा व्हिडीओ शेअर करत, “नक्की आस्वाद घ्या! अफवांवर विश्वास ठेवू नका!” असं म्हटलं आहे.