अभिनेत्री सुकन्या मोने यांनी आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दमदार भूमिका साकारत त्यांनी रसिक प्रेक्षकांनी मन जिंकत खूप मोठा चाहतावर्गही निर्माण केला. आजवर सुकन्या मोने यांनी बऱ्याच मुलाखतींमध्ये एखाद्या न पटणाऱ्या मुद्द्यावर स्पष्टपणे भाष्य केलेलं पाहायला मिळालं. अशातच सुकन्या मोने यांनी चॅनेलचा मालिकांमधील हस्तक्षेप व कलाकारांना मिळणाऱ्या मंधानाबाबत भाष्य केलं आहे. अमृता फिल्म या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुकन्या मोने यांनी याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. (Sukanya Mone On Channel)
“चॅनेल खूप हस्तक्षेप करत आहेत का?”, या प्रश्नाचं उत्तर देत, सुकन्या मोने यांनी “हो. खूप करतं”, असं म्हटलं. पुढे त्या असंही म्हणाल्या की, “टीआरपीच्या गणिताने हे सारं बिघडलं आहे. टीआरपीच्या गणितामुळे त्या कलाकृतीचा दर्जा कमी होताना दिसत आहेत. पूर्वी एकावेळी आम्ही दोन दोन मालिकांमध्ये काम करायचो, विविध भूमिका एकाच वेळी साकारायचो. आता मात्र तसं नाही आहे. आता एकावेळी एकाच मालिकेत, एकाच चॅनेलवर काम करावं लागतं. याव्यतिरिक्त एकाच चॅनेलच्या दोन मालिकांतही काम करण्याची मुभा नसते. दिग्दर्शक, लेखकांवर विश्वास ठेवायला हवा, तर ते चांगलं काम देऊ शकतील असं मला वाटतं” असं त्या म्हणाल्या.
“चॅनेलचीही काहीतरी मजबुरी असेल हे मी अमान्य करत नाही. पण चर्चा करुन हे गणित सोडवलं तर ते आरामात सुटेल असं मला वाटतं” असं सुकन्या मोने स्पष्ट म्हणाल्या. यापुढे त्यांनी मालिकांच्या शूटिंगसाठी लागणाऱ्या वेळेबाबत भाष्य केलं. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “नऊ ते दहा ही शिफ्ट कुठून आली आहे मलाच कळत नाही. आधी एपिसोडनुसार मी काम करायचे तेव्हा नऊ ते सहा अशी वेळ असायची. तेव्हा तीन दिवसांत एक एपिसोड व्हायचा, आणि मी एकावेळेला चार-चार एपिसोडमध्ये काम करायचे. पण दहाच्या पुढे कधीच काम केलं नाही. आता मात्र एपिसोड पूर्ण करायला कलाकार तब्बल ९० तास काम करतात” असं त्या म्हणाल्या.
कोणत्याही कामाचे महिना झाल्यावर पैसे मिळतात हे चॅनलकडून होतं नाही याबाबत बोलताना सुकन्या मोने म्हणाल्या, “तीन महिन्यांनी मालिकांचा पगार मिळतो हे कुठून सुरु झालं आम्हाला माहित नाही. घरात काम करणाऱ्या बाईलाही आपण महिन्याच्या महिना पगार देतो. आणि आपल्याला तीन महिन्यांनी पगार हे कुठून आलं काही माहित नाही. काही काही मालिकांच्या सेटवर अडीचवाजे पर्यंत लंचब्रेक झालेला नसतो. बरेचदा सेटवरच जेवणही चांगलं नसत” असं म्हणत त्यांनी चॅनलबाबत स्पष्टपणे भाष्य केलं.