मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांना आजवर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. विशेषतः महिला कलाकारांना त्यांच्या कपड्यावरुन, त्यांच्या राहणीमानावरुन नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली. बरीच कलाकार मंडळी वेळोवेळी या ट्रोलिंगला उत्तरं देताना दिसतात तर काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. अशातच एका मुलाखतीदरम्यान मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे हिने बिकिनी परिधान केल्यामुळे झालेल्या ट्रोलिंगबाबत भाष्य केलं आहे. (Shruti Marathe On Trolling)
श्रुतीने तामिळ चित्रपटसृष्टीत बरंच काम केलं आहे. यावेळी एका चित्रपटात काम करताना तिने बिकिनी परिधान केली होती. यावरुन श्रुती नेटकऱ्यांच्या चांगलीच कचाट्यात अडकली. श्रुती मराठेने नुकत्याच ‘आरपार युट्युब चॅनेल’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. श्रुती म्हणाली, “२०१२ मध्ये माझी राधा ही बावरी मालिका आली होती. त्याच्या आधी मी तामिळ चित्रपट केले होते. त्यातला एक चित्रपट खूप गाजला होता कारण मी त्यात बिकिनी घातली होती” असं अभिनेत्री म्हणाली.
पुढे श्रुती म्हणाली, “तेव्हा आता जशी साउथ इंडस्ट्री आहे, म्हणजे साउथ आणि आपल्या मधली कनेक्टिव्हिटी खूप कमी झाली आहे. म्हणजे ते हिंदी मराठी मध्ये डब होतात आणि ओटीटीमुळे सगळीकडे दिसतात. किंवा थिएटर मध्ये सुद्धा तुम्ही बघायला गेलात तर सब टायटल्स असतात. पण दहा पंधरा वर्षांपूर्वी असं नव्हतं. तेव्हा मी एकतर तेव्हा मी नवीन होते. कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या गोष्टी नाही करायच्या, शूट कसं केल्या जातात त्याचं कसलंही भान नव्हतं” असंही ती म्हणाली.
पुढे श्रुती म्हणाली, “पण आजसुद्धा म्हणजे मी तो बिकिनीचा सीन केला आहे म्हणून अरे बापरे मी काय केलं असं नाही वाटत. मला अजूनही आठवतं आहे की, तो चित्रपट २०१०मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा फार लोकांना मी बिकिनी घातली वगैरे माहीत नव्हतं. २०१२ मध्ये जेव्हा ‘राधा ही बावरी’ ही मालिका गाजली. अनेक लोकं श्रुती मराठे गूगल करायला लागले तेव्हा पहिला फोटो बिकिनीचा यायला लागला. तेव्हा मी खूप ट्रोल झाले. इतकी ट्रोल म्हणजे ‘राधा ही ब्रावरी’ आणि अशा अनेक गोष्टी बोलल्या गेल्या” असं श्रुती स्पष्टपणे म्हणाली.