सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवर योग्य ते भाष्य करणं आता सहज शक्य झालं आहे. याचा सकारात्मक फायदाही आहे. एखादा विषय सोशल मीडियावर मांडल्यानंतर बऱ्याचदा त्याची दखल घेतली जाते. आता असंच काहीसं सुकन्या मोने यांच्या बाबतीत घडलं आहे. शुक्रवारी (२ फेब्रुवारी) त्यांनी सोलापूरमधील यात्रेचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये लहान मुलं यात्रेत पैशांसाठी जबरदस्ती काम करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. सुकन्या यांना Whatsapp ग्रुपवर हा व्हिडीओ आला होता. या प्रकरणाची दखल घेण्याचीही त्यांनी विनंती केली होती. अखेर आता त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. (Sukanya Mone Post)
सोलापूर यात्रेमध्ये लहान मुलांना रंगवून उभं करण्यात आलं होतं. तसेच या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी मोठी मुलंही तिथे उपस्थित होती. त्यामधील एका मुलीने नशाही केली होती. व्हिडीओमध्ये संपूर्ण सत्य दिसत होतं. मुलांची पळवणूक करुन असे प्रकार घडत आहेत हे पाहूनच सुकन्या यांना धक्का बसला. कोणीतरी या प्रकारची दखल घ्यावी या हेतून सुकन्या यांनी पोस्ट शेअर केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. सुकन्या यांनी आणखी एक नवी पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.
त्या म्हणाल्या, “काल मी लहान बालकांना पळवून त्यांची काय अवस्था करतात या संदर्भात एक forwarded व्हिडीओ पोस्ट केला होता. याचे उद्देशाने की कोणीतरी ह्याची दखल घेईल आणि त्याप्रमाणे आपल्या प्रशासनाने ताबडतोब त्याची दखल घेतली. कृतीही केली. ज्यांनी हा तळमळीने व्हिडीओ काढला आणि ज्यांनी हा व्हायरल केला त्यावर श्री. अतुल वाघमारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, सोलापूर यांनी लगेच कृती केली. त्याबद्दल प्रशासनाचे आभार!”.

पुढे त्या म्हणाल्या, “जेव्हा जेव्हा समाजामध्ये अशा चुकीच्या, गैर गोष्टी होत असतील तेव्हा तेव्हा आपण या माध्यमाचा उपयोग केला पाहिजे. योग्य त्या व्यक्तीपर्यंत ती बातमी पोचली पाहिजे”. सुकन्या यांनी पोस्ट शेअर करताच चाहते मंडळी त्यांचं कौतुक करत आहेत. तसेच घडलेल्या प्रकाराची योग्य ती दखल घेतल्याबाबत प्रशासनाचेही नेटकरी आभार मानत आहेत.