अभिनेत्री सुकन्या मोने यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मराठी सिनेसृष्टीत सुकन्या यांचा खूप मोठा दबदबा आहे. सध्या त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत. एकामागोमाग एक येणाऱ्या या चित्रपटांमुळे सुकन्या मोने सध्या चर्चेत असलेल्या पाहायला मिळत आहेत. मराठीसह सुकन्या यांनी हिंदी सिनेसृष्टीतही महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली पाहायला मिळाली. सुकन्या मोने यांचा अभिनय असलेला ‘सरफरोश’ हा चित्रपटही विशेष गाजला. (Sukanya Mone On Sarfarosh)
जॉन मॅथ्यू मॅथन दिग्दर्शित ‘सरफरोश’ या चित्रपटाला नुकतीच २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. १९९९साली प्रदर्शित झालेल्या ‘सरफरोश’ चित्रपटात अभिनेता आमिर खान, सोनाली बेंद्रे, नसीरुद्दीन शाह, मकरंद देशपांडे, नवाजुद्दीन सिद्दीकी, स्मिता जयकर, मनोज जोशी, आकाश खुराना, गोविंद नामदेव, अशोक लोखंडे, सुकन्या मोने ही कलाकार मंडळी दिसली. ‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने नुकतंच चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने उपस्थिती लावली होती.
यावेळी सुकन्या मोने यांनीदेखील हजेरी लावलेली पाहायला मिळाली. जुन्या आठवणींना उजाळा देत सुकन्या यांनी खास कॅप्शन देत या रियुनियनचे फोटो शेअर केले आहेत. “कालचा दिवस खास होता. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असे घडत होते. आपण एखादा सिनेमा करतो आणि काही वर्षांनी तो गतस्मृतीत जातो पण ‘सरफरोष’ हा सगळ्याच दृष्टीने माझ्यासाठी विशेष उल्लेखनीय चित्रपट आहे. आमिर खान माझा लाडका अभिनेता आहे आणि त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळणार होती. माझी आणि जॉन Mathew matthan ची पहिली भेट. दिल्लीतले चित्रीकरण. माझी, सोनालीची आणि स्मिता जयकरची झालेली घट्ट मैत्री. आम्ही केलेली धमाल. त्या चित्रपटाला काल २५ वर्षे झाली आणि त्या निमित्ताने झालेलं रियुनियन”.
पुढे त्या म्हणाल्या, “सगळ्या जुन्या आठवणी. शूटिंगदरम्यान झालेल्या गमती-जमती. इतक्या वर्षांनी सोनालीने मारलेली घट्ट मिठी आणि आमिरचे मराठी बोलणं, त्याच्या वागण्यातला आपलेपणा, काळजी पुन्हा पहिली. मनोज जोशीची भेट झाली. जॉन आणि आभाचे अगत्याचे आमंत्रण. जॉनचा साधेपणा, त्याच्या कुटुंबाचा आपलेपणा हे सर्व पाहून भारावून गेले होते. पुन्हा पुन्हा भेटत राहू”.