कलाकारांच्या नावाचा, लोकप्रियतेचा आणि प्रसिध्दीचा वापर करुन काही आयोजक अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात. अनेकदा या कलाकारांच्या नावाने कार्यक्रमांची प्रसिद्धी केली जाते. मोठमोठ्या होर्डिंग्जवर कलाकारांचे फोटो लावले जातात आणि प्रेक्षकांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जाते. असंच काहीसं झालं एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबरोबर. अभिनेत्री स्मिता गोंदकरला कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हल २०२५ साठी बोलावण्यात आले होते. मात्र अभिनेत्री कार्यक्रमासाठी जात असतानाच आयोजकांनी तिची सोय करणार नसल्याचे सांगितलं आणि याबद्दल अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ही खूप दुर्दैवी असल्याचे सांगितलं आहे. (Smita Gondkar displeasure on event organizer)
याबद्दल अभिनेत्री असं म्हणाली की, “कलानगरी कोल्हापूर आणि महादेव साळुखे आयोजित कलानगरी कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हल २०२५ सध्या सुरु आहेत आणि २ फेब्रुवारी रोजी माझी उपस्थिती अपेक्षित होती. पण दुर्दैवाने प्रेक्षकांची दिशाभूल होत आहे. त्यामुळे मी हा व्हिडीओ करत आहे. मी मुंबईवरुन निघाले आणि पुणे सोडून मी पुढे आले. यादरम्यान माझे आयोजकांबरोबर बोलणं सुरु होतं आणि अचानक पुणे सोडल्यानंतर मला सांगण्यात आले की आम्ही तुमची सोय करु शकत नाही आणि ही खूप अनपेक्षित होतं. तर हे खूप आश्चर्यकारक आहे आणि यानिमित्ताने मला हेच सांगायचं आहे की प्रेक्षकांची दिशाभूल होत आहे”.
यापुढे स्मिता असं म्हणाली की, “आमच्याकडून इवेंटसाठी प्रसिद्धीसाठी बाईट्स घेतले जातात. हे खूप दु:खद आहे. या गोष्टी बऱ्याच कलाकारांबरोबर होतात. बऱ्याचदा आमचे फोटो लावले जातात, पण आम्हाला याबद्दल काहीच माहिती नसते. आम्हाला बाहेरुन कुठून तरी कळतं. ही खूप दुर्दैवी आहे. प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी आणि खूप गर्दी जमवण्यासाठी आमचे बाईट्स घेतले जातात. वापरले जातात, तर प्रेक्षकांना हेच सांगणे आहे की, यामागची सत्यता जाणून घ्या. आज मी या फेस्टिव्हलला येऊ शकत नसल्याने मी माझ्या प्रेक्षकांची माफी मागत आहे”.
दरम्यान, स्मिता गोंदकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावरील आपल्या अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फॅशन स्टाइलचे हजारो चाहते आहेत. ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्या चाहतावर्गामध्ये आणखीनच वाढ झाली. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे आणि अनेकांनी ही चुकीचे असल्याचे मतही व्यक्त केलं आहे.