आपल्या सुमधुर आवाजाने अवघ्या बॉलिवूडला मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध गायक म्हणजे उदित नारायण. आपल्या आवाजाने चर्चेत राहणारे हे गायक गेल्या दोन दिवसांपासून एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहेत ते म्हणजे त्यांनी लाईव्ह शो दरम्यान महिला चाहतीला केलेला किस. गायक उदित नारायण लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका महिला चाहत्याला किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि यामुळे सध्या ते सोशल मीडियावर टीकेचे धनी झाले आहेत. उदित नारायण ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर परफॉर्म करत असताना एक महिला फॅन त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी स्टेजजवळ आली होती. तेव्हा फोटो काढून होताच गायक तिच्या ओठांवर किस करतात. (Udit Narayan not feel regret or shame on fan Lip Kiss)
या संपूर्ण प्रकरणावर विविध प्रतिक्रिया समोर येत असताना आता स्वतः उदित नारायण यांनी याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. रविवारी उदित नारायण यांनी बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल म्हटलं की, “मी स्वतःला, माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या देशाला लाज वाटेल असे काही केले आहे का? आयुष्याच्या या टप्प्यावर मी सर्व काही मिळवले असताना आता मी काहीही का करु? माझे चाहते आणि माझ्यात एक शुद्ध आणि अतूट बंध आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही जे पाहिले आहे त्यावरुन माझ्या आणि माझ्या चाहत्यांमधील प्रेम दिसून येते. ते माझ्यावर प्रेम करतात. मी त्यांच्यावर अधिक प्रेम करतो”.
यापुढे उदित नारायण म्हणाले की, “या परिस्थितीबद्दल मला कोणतीही लाज किंवा खेद वाटत नाही. नाही, अजिबात नाही! आता बोलताना माझ्या आवाजातून तुम्हाला काही खंत किंवा दुःख ऐकू येते का? खरं तर, मी बोलत असताना हसतो. ही काही गुप्त गोष्ट नाही. माझे हृदय स्वच्छ आहे. जर काही लोकांना माझ्या या प्रेमात काही घाणेरडेपणा पहायचा असेल तर मी त्यांच्यासाठी दिलगीर आहे. मला त्याचे आभार मानायचे आहेत, कारण आता त्यांनी मला पूर्वीपेक्षा जास्त प्रसिद्ध केले आहे”.
उदित यांनी पुढे असं म्हटलं की, “मला भारतरत्न मिळवायचा आहे. मला अनेक फिल्मफेअर पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण मिळाले आहेत. लताजींसारखा भारतरत्न मिळावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या पिढीतील गायकांमध्ये मी त्यांचा आवडता गायक होतो हे तुम्हाला माहीत आहे का? माझ्या पिढीतील गायकांमध्ये मी त्यांच्याबरोबर सर्वाधिक गाणी गायली आहेत. जेव्हा माझ्यावर माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो, तर मला त्यांची काय पर्वा जे इतरांना यशस्वी होताना बघत नाहीत?”