स्टार प्रवाह वाहिनीवरील देवयांनी या मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. शिवानी सुर्वे ही या मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी झोतात आली. स्टार प्रवाहवरील ‘देवयानी’ या मालिकेनंतर आता शिवानी पुन्हा एकदा याच वाहिनीवरील एका नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं या नवीन मालिकेतून अभिनेत्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मनोरंजन करायला सज्ज झाली आहे.
अभिनेत्री शिवानी सुर्वेसह स्टार प्रवाह वाहिनीवरीलच ‘गोठ’ फेम अभिनेता समीर परांजपे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. शिवानी व समीर पहिल्यांदाच या मालिकेतून एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या नव्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच या मालिकेच्या निमित्ताने मज्जा पिंकशी शिवानी सुर्वेने खास संवाद साधला. यावेळी तिने अजिंक्यसाठी खास उखाणाही घेतला.
यावेळी शिवानी सुर्वेने उखाणा घेत असं म्हटलं की, “‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास, पण अजिंक्य पाहत आहे घरी माझी वाट”. या उखाण्यानंतर शिवानी गालातल्या गालात हसली. शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे यांनी ३१ जानेवारीला गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर १ फेब्रुवारीला शिवानी-अजिंक्यचा शाही विवाहसोहळा पार पडला.
खऱ्या आयुष्यात शिवानी गेली अनेक वर्षे अजिंक्य ननावरेला डेट करत होती. या दोघांची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं. २०१७ पासून शिवानी-अजिंक्य एकत्र होते. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर शिवानी ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तर अजिंक्य ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.