मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर गेली अनेक वर्षे नाटक, टेलिव्हिजन आणि मालिकांमार्फत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सविता मालपेकर त्यांच्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत घेऊन प्रेक्षकांचं मन नेहमीच जिंकून घेतात. त्या अतिशय स्पष्टवक्त्या आहेत, न पटणाऱ्या मुद्द्यांविषयी सविता मालपेकर नेहमीच आपलं ठाम मत मांडताना दिसतात. अशातच त्यांनी इट्स मज्जाच्या ठाकूर विचारणार या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल भाष्य केलं. याबद्दल सविता म्हणाल्या की, “स्पष्टवक्तपणा व खमकेपणा हा माझा स्वभाव आहे आणि इंडस्ट्रीतील लोकांनीच माझा हा स्वभाव केला आहे. एरव्ही लोकांचा साधा फोनही येत नाही. जिवंत आहे की मेली आहे हे विचारत नाहीत. कशी जगत आहेस आणि काय चाललं आहे हे काहीही विचारत नाहीत आणि दिसल्यानंतर दिखाऊपणा करतात”. (Savita Malpekar Outspokenness)
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “माझं म्हणणं आहे हे असं दिखाऊपणा करण्यापेक्षा जे आहे ते वागा. मला माहीत नाही हा गुण चांगला आहे की वाईट आहे. यामुळे माणसं कळत नकळत माझ्याकडून दुखावलीही जात असतील. पण त्याला इलाज नाही. माझ्यासमोर एखादा काळा कुळकुळीत माणूस उभा आहे आणि तुम्ही मला सांगितलं की, त्याला बरं वाटेल म्हणून तो गोरा आहे असं म्हण. पण मी केवळ त्याला बरं वाटावं म्हणून हे म्हणणार नाही. मला काय वाटतं हे महत्त्वाचे आहे. मला वाटलं हे चुकीचे आहे तर मी त्याला चुकीचेच म्हणते. त्यामुळे मी अशा ठिकाणी अलीकडे जातच नाही जिथे मी पटकन व्यक्त होते. ही नवीन सवय मी मला लावून घेतली आहे”.
आणखी वाचा – ‘आई कुठे…’च्या आठवणींमध्ये रमला अभिषेक देशमुख, आई-लेकाच्या ‘तो’ सीन आठवला अन्…; म्हणाला, “अत्यंत जवळचं…”
यापुढे सविता यांनी असं म्हटलं की, “मी काम करायला सुरुवात केल्यानंतर सर्वात आधी मला नातेवाईक आणि जवळच्या काही मित्र-मैत्रीणींनी नावे ठेवली. समाज कधीच आपल्याला नावे ठेवत नाही. समाज म्हणजे कोण तर आपलीच माणसं. मग त्याला का घाबरायचं? चुकीचे काही करत असू तर घाबरूया. वडील गेल्यानंतर जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा बऱ्याच जणांनी मला नावे ठेवली. माझ्या आईचा विरोध होता पण मी काम केलं. कारण यांचे ऐकले तर रात्री १२ वाजता मला भूक लागली तर कोण येणार आहे जेवण द्यायला? तर कोणी नाही”.
पुढे सविता असं म्हणाल्या की, “त्यामुळे मी आईला सांगितलं की, लोकांचे मला ऐकायला सांगू नकोस. कारण तुझ्याबरोबर मला माझे चार भावंडं दिसतात, ज्यांनी मी काम केलं नाही तर जेवण मिळणार नाही. माझ्याच नातेवाईकाने मला म्हटलं होतं की तोंडाला रंग लावून काम करता. यावर मी त्यांना म्हटलं होतं की, तोंडाला रंग लावून काम करायला हिंमत लागते. कोणताही पुरुष किंवा स्त्री एखादे काम करत असेल तर ते आवडीने नाही करत मजबूरीने करतात”.