मराठी मालिकाविश्वातीत लोकप्रियतेचं शिखर गाठवणाऱ्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’ ही मालिका. २०१९पासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. मात्र आता ही मालिका संपत असल्यामुळे मालिकेतील अनेक कलाकार आपल्या भावुक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच मालिकेतील यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखने मालिकेच्या शेवटच्या क्षणी मालिकेच्या आठवणीत राहतील अशा प्रसंगांबद्दल सांगितले आहे. (Yash Says Aai Kuthe Kay Karte Memorable Moments)
याबद्दल अभिषेक असं म्हणाला की, “मालिकेच्या सुरुवातीचा एक प्रसंग आहे, जिथे आईचा वाढदिवस असतो आणि आईला तिच्या वाढदिवसाची खूप उत्सुकता असते. पण घरात कुणालाही याबद्दलची कल्पना नसते. सगळेजण विसरलेले असतात. तेव्हा टेरेसवर आई कपडे वाळत घालत असताना अचानक तिला कुणी तरी हॅप्पी बर्थडे म्हणत आहे असं ऐकू येतं. तेव्हा यश तिच्यासाठी गाणं गात असतो. आणि आई व मुलाचा तो खूप चांगला सीन आहे. यश हे अरुंधतीच्या खूप जवळचे पात्र आहे. तो नेहमीच आईसाठी उभा राहिला. तर त्या दृष्टीने यश या पात्राची पायाभरणी करणारा तो सीन होता”.
यापुढे अभिषेक असं म्हणाला की, “दूसरा सीन म्हणजे आई आणि मी अंगणात बसलो आहोत. आम्ही छान मनमोकळ्या गप्पा मारत असतो. तो आई मुलगा एकमेकांबरोबर मित्र-मैत्रिणींसारखे गप्पा मारतानाचा तो एक सीन आहे. हे दोनच नाही तर असे अनेक सीन्स आहेत जे कायम लक्षात राहतील. मला संपूर्ण मालिकेत अरुंधती व अप्पा यांच्याबरोबरचे अनेक सीन्स करायला मज्जा आली. तर हे सगळेच सीन्स माझ्या आठवणीतले आणि अत्यंत जवळचे आहेत”.
आणखी वाचा – “फालतूपणा दाखवू नका”, ‘तुला शिकवीन…’वर प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “कथाच बदला आणि…”
‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या जागी आता निवेदिता सराफ व मंगेश देसाई यांची ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० ही नवी मालिका सुरू होणार आहे. तसंच ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आणखी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘लग्नाची बेडी’ ही मालिका ऑफ एअर होणार आहे.