मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रश्मी अनपट. रश्मीने आजवर अनेक मराठी नाटकं व मालिकांमध्ये काम केले आहे. ‘स्वभावाला औषध नाही’, ‘गाठीभेटी’ अशा नाटकांमध्ये तिने भूमिका केल्या आहे. तसेच ‘पुढचं पाऊल’, ‘असावा सुंदर स्वप्नाचा बंगला’, ‘फ्रेशर्स’, ‘कुलस्वामिनी’ या मालिकांमध्येही ती महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसून आली होती. तिच्या सर्व भूमिकांचे आजवर खूप कौतुक करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा ती ‘अंतरपाट’ या नवीन मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणआर आहे. या मालिकेच्या निमित्ताने रश्मीबरोबर संवाद साधला असता टीच्या खासगी आयुष्यातील अनेक पदर समोर आले आहेत. (rashmi anpat on mother in law)
रश्मी सध्या कलर्स वाहिनीवरील ‘अंतरपाट’ या मालिकेमध्ये गौतमी ही भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने रश्मीने नुकतीच ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक प्रसंगांवर भाष्य केले आहे. या मुलाखतीमध्ये तिने घरच्यांच्या पाठिंब्याबद्दल सांगितले आहे. मुलाखतीदरम्यान तिला विचारले की, “तुझ्या करिअरमध्ये घरच्यांनी किती साथ दिली?”, त्यावर तिने उत्तर दिले की, “माझ्या घरच्यांनी आजवर मला खूप साथ दिली आहे. माझी आई, बाबा, सासरे तसेच महत्त्वाचे म्हणजे माझा नवरा अमित खेडेकर. यांनी मला नेहमी सांभाळून घेतलं. त्यामुळे मी आज इथवर आहे”.
पुढे तिला विचारलं की, “मधल्या काळात तुझ्याबरोबर एक घटना घडली. त्यातून तू स्वतःला कसं सावरलंस?”, या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली की, “मी एका मालिकेच्या चित्रीकरणासाठी रत्नागिरी येथे होते. त्यावेळी माझ्या सासूबाई आजारी होत्या. अशावेळी मी त्यांच्याजवळ असणं खूप गरजेचं होतं. पण चित्रीकरणामुळे कितीही वाटलं तरीही ते शक्य नव्हतं. या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याने खूप साथ दिली होती. अमित मला म्हणाला की तू इथे येऊन तिचा त्रास कमी होणार नाही. त्यामुळे तू तुझं काम आटपून ये”.
पुढे ती म्हणाली की, “त्यानंतर अचानक त्यांचा मृत्यू झाला. रात्री दीड वाजता अमितने मला फोन करुन बोलावून घेतलं. मी पुण्यात जाऊन दोन दिवस सर्व विधी करुन पुन्हा चित्रीकरणासाठी रत्नागिरीमध्ये आले. रत्नागिरीमध्ये जाऊन तीन-चार दिवस चित्रीकरण केले आणि त्यानंतर सुट्टी मिळाली व मी पुन्हा पुण्यात गेले. त्यामुळे एखाद्या कलाकाराला काही वेळेस खरंच काहीही पर्याय नसतो.” हा प्रसंग सांगताना रश्मी खूप भावुक झाली होती. सासूबाईंच्या आठवणीने ती मुलाखतीदरम्यान रडली.
रश्मीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तिची ‘अंतरपाट’ ही नवीन मालिका १० जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.