पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी ‘जब वी मेट’ हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेत बंद असलेल्या ललित कला केंद्राची तोडफोड केली. यावर कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी निषेध व्यक्त केला होता. यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरनेही निषेध व्यक्त करत तिची प्रतिक्रिया दिली होती.
प्रियदर्शिनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून या प्रकारावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने अभाविपच्या कृत्याचा निषेध करत असे म्हटले होते की, “ललित कला केंद्र, पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करुन नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध”. दरम्यान अभिनेत्रीची ही पोस्ट तूफान व्हायरल झाली होती. यावर तिला अनेक धमक्या, मॅसेजेस आणि कमेंट्स येत होते. यावर अभिनेत्रीने पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत तिची प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियदर्शिनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला लेखक, अभिनेता हितेश पोरजेने लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे आणि त्यावर असं लिहिलं आहे की, “ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर मी एक भूमिका व्यक्त केल्याबद्दल गेले ३-४ दिवस मला अनेक भयंकर मॅसेजेस, कमेंट्स आणि काही धमक्या येत आहेत. त्यावर ही पोस्ट कदाचित काही गोष्टी सोप्या करून सांगेल.”

यावर प्रकरणावर हितेशने पोस्ट भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने असं म्हटलं आहे की, “संपूर्ण प्रकरण ज्या नाटकाभोवती फिरतंय, त्याचा संपूर्ण प्रयोग हल्लेखोरांनी पाहिलेला नाही. नाटकाचा जो फॉर्म वापरला गेलाय तो समजून घेऊन त्याबद्दल त्यांनी चर्चा करण्याची, वाद घालण्याची हिंमत दाखवली नाही. सो कॉल्ड धर्म-संस्कृतीरक्षक हे असे असतांना देशाला आणि संस्कृतीला कोण कुठे पोहोचवतंय ह्यात कंफ्यूजन व्हायलाच नको.”
तसेच या पोस्टच्या शेवटी त्याने असं म्हटलं आहे की, “ललितच्या संपूर्ण प्रकरणावर व्यक्त व्हायला आत्तातरी माझ्याकडे फक्त शब्द आहेत. ‘निषेध’, ‘पाठिंबा’ ह्या शब्दांसोबतच हे अजून काही शब्द माझ्या ललितच्या मित्र आणि मैत्रिणींसाठी. आपल्याकडे शब्द आहेत, ते व्यक्त करायला माध्यम आहे, त्याचा वापर करू. झुंडी सतत अंगावर येत राहणार. त्यांना आपल्या कामाने, प्रेमाने मैलभर कोलवत राहू. सोबत फुले, आंबेडकर आहेतंच!”