मराठी नाट्यसृष्टीतल्या दिग्गजांच्या यादीतलं प्रशांत दामले हे एक नाव आहे. मराठी रंगभूमीसह मालिकाविश्व, सिनेसृष्टीतही प्रशांत दामले यांचा वावर आजही कायम आहे आणि तो प्रेक्षकांच्याही तितकाच पसंतीस पडतो. गेली ४० वर्ष प्रशांत दामले सिनेसृष्टीत अविरतपणे कार्यरत आहेत. या ४० वर्षातील त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकीर्द खूप मोठी आहे. नाटक, रंगमंचाला जोडून ठेवणारा हा एक मोठा दुवा आहे. अभिनेते असण्याबरोबरच ते गायक, पार्श्वगायक व नाट्यनिर्मातेही आहेत. विनोदी अभिनयासाठी मराठी नाटक आणि चित्रपट जगतात ते परिचित आहेत. (Prashant Damle Answers to Trollers)
वसंत सबनीस यांनी लिहिलेलं ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर परतत आहे. या नाटकात प्रशांत दामले व विनय येडेकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या जोडीच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले. आता हे नाटक पुन्हा एकदा रंगमंच गाजवायला सज्ज झाले आहे. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने ‘ब्रेक’ घेतला खरा पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे नाटक सज्ज झाले आहे.

अवघ्या चार दिवसांत हे नाटक पुन्हा रंगमंचावर सज्ज होत आहे. दरम्यान कलाकार या नाटकाच्या तालमीत रंगलेले दिसत आहेत. अशातच नाटकाच्या तालमीचा एक व्हिडीओ प्रशांत यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी कमेंट करत नाटकाबाबत उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान एका नेटकऱ्याच्या कमेंटने अधिक लक्ष वेधलं आहे.
नेटकऱ्याने खोचक कमेंट करत, “दामले निवृत्त व्हा”, असं म्हटलं आहे. यावर प्रशांत दामले यांनी कमेंट करत, “का हो?”, असा सवाल करत नेटकऱ्याला प्रतिउत्तर दिलं आहे. यावर त्या नेटकऱ्याने पुन्हा कमेंट करत, “रसिक प्रेक्षक काही बोलत नसले तरी आता तुमचा कंटाळा आला आहे. तुमचा रवी शास्त्री होऊ नये”, असं म्हटलं आहे. यावर दामलेंनी कमेंट करत, “रसिक प्रेक्षक बोलत नाहीत हे खरं आहे. पण त्यांच्या मॅसेजवरुन कळतं की कधी थांबायचे. मला अंदाज येतो. सल्ल्याबद्दल धन्यवाद”, असं म्हणत सडेतोड उत्तर दिलं आहे.