आज गणेश चतुर्थी, गणेशोत्सवातील पहिला दिवस. देशभरात आज लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. गणरायाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली असून ठिकठिकाणी काल रात्रीपासूनच बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर आज सकाळी बाप्पाची पहिली आरतीदेखील झाली आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार मंडळींच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले असून अनेकांच्या घरी काल बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. (Prarthana Behere welcomes Ganpati Bappa)
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या घरी काल रात्री गणरायाचे आगमन झाले आहे. याचा व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रार्थनाच्या घरी गणपतीची सुंदर मूर्ती विराजमान झाली असून ती व तिचा पती गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिसत आहे. यावेळी प्रार्थना बेहेरे पारंपरिक वेशभूषेत दिसून आली.
हे देखील वाचा – Video : गणपतीसाठी चार वर्षांनी कोकणातील गावी निघाले अविनाश नारकर, व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “माझ्या गावी जाताना…”
प्रार्थनाने गणरायाच्या मूर्तीच्या सभोवताली सुंदर अशी फुलांची आरास केली आहे. तिने हा संपूर्ण व्हिडिओ तिच्या युट्युब चॅनलवर केला असून त्याची छोटीशी झलक तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली आहे. पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने गणपती बाप्पाचा जयघोष केला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.