कलाकारांच्या अभिनयाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. कलाकारांच्या अभिनयाने आजवर साऱ्या प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. मात्र या कलाकारांच्या पडद्यामागील मेहनत, त्यांची पडद्यामागील कसरत याबद्दल फार कमी जणांना ठाऊक असेल. इतकंच नव्हे तर आजकाल कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयाच्या कौतुकापेक्षा ट्रोल होताना दिसतात. अनेकदा या कलाकार मंडळींना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र ट्रोलर्स यावेळी कलाकारांच्या मेहनतीचा विचार करताना दिसत नाहीत. (Siddharth Jadhav Special Act)
कलाकार मंडळींना त्यांच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळ मिळत नाही. स्वतःसाठी म्हणा, वा कुटुंबासाठी ही कलाकारांना वेळ मिळत नाही. इतकंच नव्हेतर शूटिंगच्या तारखा बरेचदा त्यांना घरापासून, घरच्या कार्यापासून दूर ठेवतात. कित्येक नवोदित कलाकारांना तर ऑडिशननिमित्त बरेचदा अनेक संकटाना पार करुन पोहचावे लागतं. अनेक खेड्यापाड्यातून शहरात आलेल्या या कलाकार मंडळींचा खिशाला न परवडणारा प्रवास केवळ सुपरस्टार होण्यापायी सुरु असतो.
कलाकारांच्या याच खडतर प्रवासाचं वर्णन यंदाच्या झी नाट्य गौरव २०२४ या सोहळ्यात सादर करण्यात आलं. अर्थात या सादरीकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे सादरीकरण अभिनेता सिद्धार्थ जाधव याने सादर करत सर्वांची मनं जिंकली. या खास सादरीकरणावरुन पोस्ट शेअर करत, सिद्धार्थ म्हणाला, “‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्यात महेश मांजरेकर सरांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं नाटक ‘मी शारूख मांजरसुंभेकर’ या माझ्या नाटकातील एक प्रवेश सादर करण्याची संधी मला मिळाली. आभारी आहे”, असं म्हटलं.
सिद्धार्थने यावेळी सादर केलेल्या प्रवेशात, ऑडिशननिमित्त आलेल्या एका कलाकाराची संघर्षगाथा दाखवण्यात आली. नुकतंच आईच निधन झाल्यानंतर तिच्या मैतालाही न जाता महेश मांजरेकरांच्या ऑडिशनला हजेरी लावणाऱ्या या कलाकाराची कथा सुरु झाली. बाराव्याला जाईन, असं म्हणत तो कलाकार केवळ सुपरस्टार होण्याची आस लावून बसला होता. आणि हो इतकंच नाही तर, पुन्हा घरी कार्याला जाण्यासाठी खिशात पैसे नसल्याचंही त्याने सांगितलं”, अशा वर्णन स्वरूपात एका कलाकाराची मांडण्यात आलेली ही कथा साऱ्यांच्या हृदयाला स्पर्शून गेली. दरम्यान सिद्धूचा अभिनय आणि सादर केलेला प्रवेश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.