मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मृण्मयीने अभिनयासह सूत्रसंचालक म्हणून उत्तमरीत्या जबाबदारी पेलवली. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयीचे नाव आवर्जून घेतलं जातं. सोशल मीडियावरही मृण्मयी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच काही ना काही शेअर करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मृण्मयी आणि तिची बहीण गौतमी यांचे अनेक व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. (Mrunmayee Deshpande Video)
देशपांडे सिस्टर्सची धम्माल, मस्ती प्रेक्षकांना पाहायला नेहमीच आवडतं. अशातच आता मृण्मयीने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र हा व्हिडीओ मृण्मयीने तिच्या बहिणीबरोबर न शूट करता तिच्या आईबरोबर शूट केला आहे. मृण्मयी सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याच पाहायला मिळत आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा मृण्मयीचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मृण्मयी सध्या व्यस्त आहे.
या व्हिडीओमध्ये मृण्मयी तिच्या आईकडून सेवा करुन घेताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये मृण्मयी असं बोलताना दिसत आहे की, “चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सततचा मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक, मुंबई-कोल्हापूर असा प्रवास करुन घरी आल्यानंतर ज्या गोष्टीची सर्वात जास्त आवश्यकता असते ती गोष्ट म्हणजे आईच्या हाताने डोक्याला मालिश. व्हिडीओमध्ये मृण्मयी तिच्या आईकडून डोक्याला मसाज करुन घेताना दिसत आहे. म्हणजेच या व्हिडीओमध्ये मृण्मयीची आई लेकीच्या डोक्याला तेल मालिश करताना दिसत आहे.
मृण्मयी तिच्या आईच्या हाताने तेल मालिश करून घेताना खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी आनंदात तिने आईकडून लाड पुरवून घेतानाचा हा व्हिडीओ शूट केला आहे. “लाड = आई = लाड टूक टूक गौतू”, असं कॅप्शन देत तिने तिची बहीण गौतमीला ही पोस्ट टॅग करत चिडवलं आहे. आईच्या हातचं तेल मसाज ही प्रत्येकाच्या जवळची गोष्ट आहे. त्यामुळे मृण्मयीने हा खास व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शविली आहे.